

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ‘गोट इंडिया टूर’दरम्यान लियोनेल मेस्सीने आतापर्यंत क्रिकेट स्टार्स आणि बॉलीवूड सेलिब्रिटींसह अनेक नामवंतांची भेट घेतली आहे. एका व्हीआयपीने मेस्सीसोबत हस्तांदोलन करण्यासाठी 1 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
लियोनेल मेस्सीची इंडिया टूर आता अंतिम टप्प्यात असून, आठवेळा बॅलन डी’ऑर विजेता असलेला हा फुटबॉलपटू सोमवारी (15 डिसेंबर) देशाची राजधानी दिल्ली येथे पोहोचला. ‘मीट अँड ग्रीट’ कार्यक्रमात निवडक आणि कॉर्पोरेट पाहुण्यांना मेस्सीची भेट घेण्याची संधी मिळणार आहे. कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये मेस्सीच्या भारत दौर्याच्या पहिल्या दिवशी गोंधळ उडाल्यानंतर, दिल्लीतील त्याच्या हॉटेलभोवती आणि भेटीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. जागतिक फुटबॉल आयकॉनला भेटण्यासाठी काही व्यक्ती फक्त हस्तांदोलनासाठी 1 कोटी रुपये मोजायला तयार आहेत. यावरून भारतीय चाहत्यांमध्ये मेस्सीची लोकप्रियता किती प्रचंड आहे, हे दिसून येते.