

शीतयुद्धाचा काळ होता. चीनने आपली पहिली अणुचाचणी करून संपूर्ण जगाला धक्का दिला होता. चीनच्या वाढत्या अणुशक्तीमुळे अमेरिका आणि भारत दोघेही चिंतेत होते. याच चिंतेतून एक अत्यंत गोपनीय मिशन जन्माला आलेले आजही प्रश्न आणि भीतीने वेढलेले आहे. ही कथा आहे हिमालयातील दुर्गम नंदा देवी शिखरावर ‘सीआयए’कडून ठेवण्यात आलेल्या एका अणुउपकरणाची, जे आजतागायत सापडलेले नाही.
चीनच्या क्षेपणास्त्र आणि अणुचाचण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘सीआयए’नेे एक अनोखी योजना आखली होती. हिमालयाच्या उंच शिखरावर एक गुप्त निरीक्षण केंद्र उभारण्याचा हा प्लॅन होता, ज्यामधून रेडिओ सिग्नल टिपता येणार होते. यासाठी ‘स्नॅप-19 सी’ नावाचा एक पोर्टेबल अणुजनरेटर वापरण्यात आला, जो प्लूटोनियमवर चालत होता.
हे मिशन इतके गुप्त होते की, फारच थोड्या लोकांना त्याची माहिती होती. ऑक्टोबर 1965 मध्ये ही टीम शिखराच्या जवळ कॅम्प फोरपर्यंत पोहोचली होती. मात्र, अचानक एक भीषण हिमवादळ आले. परिस्थिती जीवघेणी बनली. गिर्यारोहकांचे प्राण वाचवण्यासाठी कॅप्टन कोहली यांनी कठोर निर्णय घेतला. त्यांनी उपकरण तिथेच सोडून तातडीने खाली परतण्याचे आदेश दिले.
‘सीआयए’चे हे गुप्त मिशन पार पाडण्यासाठी अमेरिकन गिर्यारोहकांची निवड केली आणि भारताच्या गुप्तचर संस्थांच्या मदतीने नंदा देवीवर चढाई करण्यात आली. त्यावेळी भारतीय बाजूचे नेतृत्व कॅप्टन एम. एस. कोहली करत होते.
सर्वात मोठी चिंता ही होती की, नंदा देवीचे ग्लेशियर गंगा नदीच्या उपनद्यांना उगम देतात. जर प्लूटोनियम पाण्यात मिसळले, तर कोट्यवधी लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
सुमारे 50 किलो वजनाचा हा अणुजनरेटर बर्फात सुरक्षितरीत्या बांधून ठेवण्यात आला; पण पुढच्या वर्षी जेव्हा टीम तो परत आणण्यासाठी गेली, तेव्हा तो गायब झाला होता.