पणजी: मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मंगळवारी 28 रोजी रात्री उशिरा हणजूण येथील एका हॉलिडे रिसॉर्टमधून ड्रग्ज व्यवहार माफिया दानिश चिकना ऊर्फ दानिश मर्चंट याला अटक केली आहे. तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार आहे. मुंबईतील ड्रग्ज रॅकेटचा तो मुख्य सूत्रधार आहे. गोव्यातील ड्रग्ज माफियांशी त्याचे संबंध असण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई एनसीबी अधिकारी त्याच्या शोधात होते.
गेल्या सप्टेंबर महिन्यात एनसीबीने पुण्यात टाकलेल्या एका छाप्यात 502 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केल्यानंतर अटक केलेल्या संशयितांच्या चौकशीत दानिश याचे नाव समोर आले होते. त्यामुळे मुंबईत वास्तव्य असलेल्या त्याची काही ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. मात्र तो सापडला नव्हता. त्याच्या निवासस्थानातील एका सहकाऱ्याला ताब्यात घेतल्यावर सुमारे 839 सिंथेटीक ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या रॅकेटचे मुख्य सूत्रधार असलेला दानिश व त्याची पत्नी हे वारंवार पोलिसांना गुंगारा देत होते. अनेक राज्यांमध्ये ते आश्रय घेत असल्याने एनसीबीने त्यांच्यावर पाळत ठेवण्यात सुरुवात केली होती.
दानिश हा गोव्यात असल्याची माहिती मिळाल्यावर एनसीबीचे पथक गोव्यात आले होते. त्यांनी गोवा पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मंगळवारी रात्री त्याला पत्नीसह ताब्यात घेऊन एनसीबीचे पथक मुंबईला रवाना झाले.
मुख्य सूत्रधार दानिश चिकना हा ड्रग्ज तसेच अन्य गुन्ह्यांमध्ये सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई एनसीबी व राजस्थान पोलिसांनी ड्रग्जच्या आरोपाखाली गुन्हे नोंद आहेत. याव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये सात गुन्हेगारी गुन्हेही त्याच्यावर आहेत. मुंबईतून त्याला यापूर्वी तडिपार करण्यात आले होते. त्याचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचाही आरोप आहे.
मुंबईच्या डोंगरीत ड्रग्ज सिंडिकेट...
मुंबई व देशाच्या इतर भागांमध्ये ड्रग्जचे व्यवस्थापन व वितरण करण्यात त्याची भूमिका असल्याचे एनसीबीला आढळून आले होते. मुंबईच्या डोंगरी भागात ड्रग्ज सिंडिकेट चालवल्याच्या आरोपाखाली एनसीबीने चिकनाला यापूर्वी अटक झाली होती. अटकेनंतरही नवीन नेटवर्क वापरून बेकायदेशीर व्यापार तो करत होता.