CUET UG 2026 Delay Pudhari
राष्ट्रीय

CUET UG 2026 Delay: नीट नंतर आणखी एका परीक्षेत मोठा गोंधळ! तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा उशिरा; NTA ने बदलली वेळ, काय घडलं?

CUET UG 2026 Delay: CUET UG 2026 परीक्षेदरम्यान अनेक केंद्रांवर तांत्रिक बिघाड झाल्याने परीक्षा वेळेत सुरू होऊ शकली नाही. NTA ने दुसऱ्या शिफ्टची वेळ बदलून दुपारी 4 वाजता परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढारी वृत्तसेवा

CUET UG 2026 Delay: देशभरातील अनेक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली CUET UG 2026 (Common University Entrance Test) परीक्षा शुक्रवारी (30 मे) काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली. अचानक आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ परीक्षा केंद्रांवर थांबावे लागले. विशेषतः दुसऱ्या शिफ्टमधील विद्यार्थ्यांना या समस्येचा सर्वाधिक फटका बसला.

राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने दिलेल्या माहितीनुसार, सेवा पुरवठादार कंपनीकडून झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही अडचण निर्माण झाली. या बिघाडामुळे काही केंद्रांवर परीक्षा वेळेत सुरू होऊ शकली नाही. मात्र, समस्या लवकरच सोडवण्यात आल्याचा दावा NTA ने केला आहे.

या गोंधळानंतर NTA ने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल जाहीर केला. दुपारच्या सत्रासाठी विद्यार्थ्यांना दुपारी 2:30 नंतर रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले असून परीक्षा आता दुपारी 4 वाजता सुरू होणार आहे. याआधी ही परीक्षा दुपारी 3 वाजता सुरू होणार होती.

सकाळच्या शिफ्टमधील विद्यार्थ्यांबाबतही NTA ने स्पष्ट भूमिका घेतली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना पूर्ण वेळ देण्यात येईल आणि परीक्षा पूर्ण झाल्यानंतरच बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.

NTA ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अधिकृत माहिती देताना सांगितले की, ही समस्या सेवा पुरवठादार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्या स्तरावर निर्माण झाली होती. तांत्रिक अडचण दूर करण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांना ‘कम्पेन्सेटरी टाइम’ दिला जाईल, जेणेकरून कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही.

या घटनेनंतर NTA ने हेल्पलाइन क्रमांक +91-11-40759000 आणि अधिकृत ई-मेल सपोर्टची माहितीही जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांनी पुढील अपडेट्ससाठी अधिकृत CUET UG पोर्टलवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, देशभरात लाखो विद्यार्थी संगणक आधारित प्रवेश परीक्षा देत असताना अशा तांत्रिक अडचणी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ऑनलाइन परीक्षांसाठी मजबूत तांत्रिक व्यवस्था किती महत्त्वाची आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT