CRPF Pellet Gun Report: NEET प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलन आणि त्यानंतरच्या संसद मार्चदरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला होता. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी पॅलेट गनचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेत तीन आंदोलक गंभीर जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. दिल्ली पोलिसांनी मात्र पॅलेट गन वापरल्याचा आरोप फेटाळला होता. आता केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) अहवालामुळे या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.
CRPF च्या अहवालानुसार, आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) ला पंप अॅक्शन गन, म्हणजेच पॅलेट गन वापरण्याची अधिकृत मंजुरी देण्यात आली होती. ही कारवाई करताना सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्यात आल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
अहवालानुसार, 20 जुलै रोजी संसद मार्चदरम्यान परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतरच पॅलेट गन वापरण्यात आली. त्याआधी आंदोलकांना सार्वजनिक इशारा देण्यात आला, त्यानंतर अश्रुधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि लाठीचार्जही करण्यात आला. हे सर्व उपाय निष्फळ ठरल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंजुरीने पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या कारवाईत पॅलेट गनमुळे तीन ते पाच आंदोलक जखमी झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दुसरीकडे, आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक संघर्षात RAF चे 47 जवान जखमी झाले असून त्यापैकी सहा जवानांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
या प्रकरणावर CRPF चे महासंचालक जी. पी. सिंह यांनी सार्वजनिक भाष्य करण्यास नकार दिला. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने CRPF दलाची अधिकृत भूमिका न्यायालयासमोरच मांडली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.