Crime News
जालौन: उत्तर प्रदेशमधील जालौन जिल्ह्यातील कुठौंद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण कुमार राय यांच्या आत्महत्येचे प्रकरण रहस्यमय बनले आहे. त्यांच्या खोलीतून घाबरून ओरडत बाहेर पडलेल्या महिला कॉन्स्टेबल मीनाक्षी शर्मा हिला पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात मीनाक्षीची भूमिका सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात होती.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला कॉन्स्टेबल आणि पोलीस निरीक्षक यांच्यातील अनैतिक संबंध मृत्यूला कारणीभूत ठरले. त्यांची पत्नी माया रायच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सर्वबाजूने तपास सुरू आहे.
५ डिसेंबरच्या रात्री इन्स्पेक्टर अरुण कुमार राय यांनी त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःच्या कपाळावर गोळी झाडली होती. गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार गेली होती. पिस्तूल त्यांच्या पोटावर पडलेले आढळले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये रात्री ९:१५ वाजता कॉन्स्टेबल मीनाक्षी इन्स्पेक्टरच्या घरी पोहोचली आणि ९:१८ वाजता गोळी झाडल्याचे सांगत किंचाळत तेथून पळून गेली.
सूत्रांनुसार, महिला कॉन्स्टेबल २०२४ पासून अरुण राय यांच्या संपर्कात होती. या काळात दोघांमध्ये जवळीक वाढली. जुलै २०२४ मध्ये कोंच पोलिस ठाण्यात तैनात असताना मीनाक्षी त्यांच्या संपर्कात आली. राय यांची कोंचहून उरई येथे बदली झाली. त्यानंतरही मीनाक्षी त्यांच्याकडे येत-जात होती. जेव्हा त्यांची बदली कुठौंद येथे झाली, तेव्हाही मीनाक्षी त्यांना भेटायला जात असे.
रविवारी मीनाक्षी शर्माला अटक करण्यात आले असून तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. पोलिसांनी तिला अनेक प्रश्न विचारले, पण तिने फक्त काही प्रश्नांचीच योग्य उत्तरे दिली. पोलिस सूत्रांनुसार, तिच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून इन्स्पेक्टर राय यांनी आत्महत्या केली आहे. मीनाक्षी आणि इन्स्पेक्टर अरुण यांच्यात प्रेमसंबंध होते, असे सांगितले जात आहे.
शनिवारी आत्महत्येपूर्वी महिला कॉन्स्टेबलचे अरुण यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते. ती त्यांच्याकडे काही मागणी करत होती. दोघांमध्ये फोनवर वाद झाला होता. यानंतर मीनाक्षी राय यांच्या पोलिस ठाण्यात पोहोचली. तिला पाहताच राय यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली. तिने काही आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले होते आणि ब्लॅकमेल करत २५ लाख रुपयांची मागणी करत होती, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. तिने नुकताच ३ लाख रुपयांचा हार घेतला होता.
मीनाक्षी यूपी पोलिसात कॉन्स्टेबल पदावर असली तरी तिचे राहणीमान इतर पोलिसांपेक्षा खूप वेगळे होते. तिच्या स्वभावामुळे ती इतर सहकाऱ्यांपासून लांबच होती. पोलिसांनी मीनाक्षीकडून आयफोनसह ३ मोबाईल जप्त केले आहेत. पोलिस या सर्व मोबाईलमधील डेटा तपासत आहेत.
मीनाक्षी ही मूळची मेरठ जिल्ह्यातील असून २०१९ मध्ये तिची कॉन्स्टेबल पदावर नियुक्ती झाली. तिची पहिली पोस्टिंग पीलीभीतमध्ये झाली होती. या काळात तिने एका शिपायावरही गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर तिची बदली जालौन येथे करण्यात आली.