Crime News
गुजरात : प्रत्येक मुलीसाठी तिचा लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वात सुंदर स्वप्न. असच पाहिलेलं स्वप्नं प्रत्यक्षात अनुभवत होती. अनेक अडचणींवर मात करून आणि समाजाचा विरोध पत्करून ती तिच्या प्रियकरासोबत नवीन आयुष्य सुरू करणार होती. विवाहाचा मुहूर्त अवघ्या काही मिनिटांवर होता. काही वेळात मंगलाष्टका सुरू होणार होत्या, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं; लग्नाच्या 'त्या' पवित्र क्षणापूर्वी साडी आणि पैशांवरून झालेल्या एका क्षुल्लक वादातून प्रियकरानेच तिच्या स्वप्नांचा आणि जीवनाचा क्रूर अंत केला. (Crime News)
गुजरातमधील भावनगर येथे शनिवारी ही अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. विवाहबंधनात अडकण्याच्या अवघ्या एक तास आधी प्रियकराने आपल्या वधूला साडी आणि पैशांवरून झालेल्या क्षुल्लक वादातून ठार मारले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी साजन बारैया याला अटक केली असून घटनेमुळे भावनगर शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सोनी हिम्मत राठोड आणि आरोपी साजन बारैया यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबाचा विरोध असतानाही त्यांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले होते. त्यांचा साखरपुडा झाला होता आणि शनिवारी ते विवाहबद्ध होणार होते.
मात्र, लग्नाच्या तयारी दरम्यानच दोघांमध्ये साडी आणि पैशांवरून जोरदार भांडण सुरू झाले. हा वाद विकोपाला गेला आणि प्रेम क्षणार्धात क्रोधात बदलले. रागाच्या भरात साजनने कोणताही विचार न करता घरात असलेली लोखंडी पाईप उचलली आणि लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या सोनीला अमानुष मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, त्याने तिचे डोके भिंतीवर जोरजोरात आपटले, यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
खून केल्यानंतर आरोपी साजनने घरात तोडफोड केली आणि लगेचच घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधीक्षक आरआर सिंघल यांनी मांध्यमांशी बोलताना सांगितले, "हे दोघे कुटुंबाचा विरोध असूनही एकत्र राहत होते. लग्नाच्या एक तास आधी साडी आणि पैशांवरून वाद झाला. याच वादातून साजनने पाईपने मारहाण करून सोनीचे डोके भिंतीवर आपटले. तिचा जागीच मृत्यू झाला."