Sidhu Moosewala BBC documentary The Killing Call You Tube release father legal notice
नवी दिल्ली : पंजाबी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायक सिद्धू मूसेवाला यांच्या जीवनावर आधारित बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसची दोन भागांची डॉक्युमेंटरी ‘The Killing Call’ नुकतीच यूट्यूबवर प्रदर्शित झाली आहे. विशेष म्हणजे, ही डॉक्युमेंटरी सिद्धू यांचे वडील बलकौर सिंह यांच्या कायदेशीर आक्षेप आणि न्यायालयीन याचिकेनंतरही प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
सिद्धू मूसेवाला यांचे वडील बलकौर सिंह यांनी बीबीसीच्या डॉक्युमेंटरीविरोधात मंसा येथील सिव्हिल कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांचा आरोप आहे की, सिद्धू मूसेवाला यांच्या जीवनकथेचा वापर परवानगीशिवाय करण्यात आला आहे. डॉक्युमेंटरीमुळे खाजगीपणाचा भंग होतो आणि चौकशीवर परिणाम होऊ शकतो, असेही बलकौर सिंह यांचे म्हणणे आहे.
या प्रकरणात BBC World Service, इशलीन कौर आणि अंकुर जैन यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यांनी महाराष्ट्र पोलीस आणि जुहू पोलिस ठाण्याशीही संपर्क साधला, पण अद्याप अधिकृत उत्तर मिळालेले नाही.
BBC च्या माहितीनुसार, ‘The Killing Call’ ही डॉक्युमेंटरी दोन भागांत विभागलेली आहे- पहिला भाग – सिद्धू मूसेवाला यांचे बालपण, त्यांचा उदय, लोकप्रियता, आणि वादग्रस्त घडामोडी यांचे चित्रण. दुसरा भाग – त्यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीचा शोध, गुन्हेगारी टोळ्यांचा हस्तक्षेप, आणि पोलिस तपासावर आधारित माहिती. यामध्ये सिद्धूचे मित्र, पत्रकार, पोलिस अधिकारी यांचे मुलाखती, तसेच गोल्डी ब्रार याची ऑडिओ क्लिप समाविष्ट आहे. गोल्डी ब्रारने हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.
बीबीसीच्या म्हणण्यानुसार, ही कहाणी भारताच्या गावांपासून ते कॅनडाच्या हिप-हॉप संस्कृतीपर्यंत, पंजाबच्या अस्थिर इतिहासापासून ते भारतीय राजकारण आणि संघटित गुन्हेगारीपर्यंत पोहोचते.
सिद्धू मूस वाला उर्फ शुभदीप सिंग सिद्धू यांची हत्या 29 मे 2022 रोजी पंजाबच्या मंसा जिल्ह्यात भरदिवसा झाली. त्यावेळी ते पोलीस सुरक्षा विना प्रवास करत होते. 30 पेक्षा जास्त गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
गोल्डी ब्रार, जो लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहे, याने सोशल मीडियावरून हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. NIA ने त्याला 'वैयक्तिक दहशतवादी' घोषित केले असून तो अद्याप फरार आहे.
बलकौर सिंह यांचे म्हणणे आहे की, डॉक्युमेंटरीमध्ये दाखवलेली माहिती खोटी आणि भ्रामक आहे. ही माहिती सिद्धूच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवू शकते आणि त्याच्या हत्येच्या तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यांनी डॉक्युमेंटरीचे प्रदर्शन थांबवण्यासाठी तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
9 जून 2025 रोजी मंसा जिल्हा न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायाधीश राजिंदर सिंग नागपाल यांनी तात्पुरती स्थगिती देण्यास नकार दिला. पुढील सुनावणी 12 जून 2025 रोजी ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या यूट्यूबवर डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाल्यानंतर ती वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पुढील न्यायालयीन निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.