

Kerala high court notice to member of parliament form waynad Priyanka Gandhi
कोची : केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वधेरा यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या संदर्भात आहे. न्यायालयाने या याचिकेवर त्यांचे उत्तर मागवले आहे.
ही याचिका भाजप नेत्या नव्या हरिदास यांनी दाखल केली आहे. त्यांनी वायनाड मतदारसंघातून प्रियंका गांधींच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
नव्या हरिदास यांचा आरोप आहे की, प्रियंका गांधींनी त्यांच्या उमेदवारी अर्जामध्ये स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती योग्यरीत्या जाहीर केली नाही.
नव्या हरिसाद यांचा दावा आहे की, प्रियंका गांधींनी जाणीवपूर्वक संपत्तीची माहिती लपवली, जेणेकरून निवडणुकीचा निकाल प्रभावित होईल. हे वर्तन "भ्रष्ट आचारधर्म" (corrupt practice) म्हणून गणले जाऊ शकते.
त्यांनी खोटी माहिती देऊन आचारसंहितेचाही भंग केला असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी ऑगस्ट महिन्यात होणार आहे.
प्रियंका गांधी यांनी निवडणूक अर्जात 12 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जाहीर केली होती. त्यांच्याकडे 4.24 कोटींची चल संपत्ती आणि 7.74 कोटींची अचल संपत्ती असल्याचे त्यांनी नमूद केले होते.
त्याशिवाय, त्यांनी पती रॉबर्ट वाड्रा यांच्या मालमत्तेचाही तपशील दिला होता. वाड्रा यांच्याकडे एकूण 65.54 कोटी रुपयांची संपत्ती आहे, त्यामध्ये 37.9 कोटींची चल मालमत्ता आणि 27.64 कोटींची अचल मालमत्ता आहे.
2024 लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी वायनाड जागा सोडली. त्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने प्रियांका गांधी यांना उमेदवार म्हणून उभे केले. ही प्रियांका गांधींची पहिली निवडणूक होती.
प्रियांका यांनी CPI चे सत्यन मोकेरी यांना 4 लाख 10 हजार मतांनी पराभूत केले. भाजप उमेदवार नव्या हरिदास या 1 लाख 9 हजार मतांसह तिसऱ्या स्थानावर राहिल्या.
विशेष म्हणजे प्रियांकांनी मताधिक्याच्या बाबतीत भाऊ राहुल गांधींचाही विक्रम मोडला. 2024 मध्ये राहुल गांधींनी या जागेवर सुमारे 3.65 लाख मतांनी विजय मिळवला होता.
28 नोव्हेंबर 2024 रोजी, 52 वर्षांच्या वयात प्रियंका गांधी यांनी लोकसभेच्या खासदार पदाची शपथ घेतली. त्यामुळे सध्याच्या संसदेत गांधी-नेहरू परिवारातील तीन सदस्य संसदेत उपस्थित झाले.