Consumer Court Orders: हिमाचल प्रदेशच्या कांगरामधील करणवीर सिंह पटियाल यांनी २६ जुलै २०२४ रोजी एका स्थानिक दुकानातून रियल फ्रुट पॉवर मोसंबी ज्युसचा एक लिटरचा पॅक खरेदी केली होता. ते श्राणवातील धार्मिक उपवास करत होते. त्यावेळी त्यांनी हा ज्युस पिला. मात्र त्यांना याची चव वेगळी वाटली म्हणून त्यांनी पॅक काळजीपूर्वक पाहिलं. त्यावेळी त्यांना या पॅकमध्ये आत काळ्या रंगाची बुरशी साचली असल्याचं दिसलं.
त्यांनी हे बुरशीयुक्त ज्युस पिल्यामुळं त्यांचा उपवास सुटला. त्यामुळं त्यांना भावनिक आणि आध्यात्मिक धक्का बसला. त्याचबरोबर त्यांचे आरोग्य देखील धोक्यात आलं. यानंतर त्यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात याविरूद्ध दाद मागितली. न्यायालयाने देखील डाबर इंडियावर दुषित रिअल फ्रुट पॉवर मोसंबी ज्युस विकल्याप्रकरणी कारवाई केली. न्यायालयाने कंपनीला एकूण १ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. यात याचिका करण्यासाठी आलेल्या खर्चाची देखील भरपाई समाविष्य करण्यात आली आहे. हा आदेश ९ जुलै रोजी देण्यात आला आहे.
करणवीर सिंह पटियाल यांनी ज्यावेळी बुरशीयुक्त ज्युसमुळं त्यांचा उपवास मोडला त्याचवेळी डाबर कंपनीला ईमेल केला होता. कंपनीने दुसरी ज्युस बॉटल देण्याची ऑफर ठेवली. मात्र पटियाल यांनी ती नाकारली आणि हे उत्तर पुरेसं नाही असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी कंपनीवर ५ लाख नुकसान भरपाई देण्याची कायदेशीर नोटीस पाठवली. मात्र या नोटीशीला काही उत्तर मिळालं नाही. त्यानंतर पटियाल यांनी ग्राहक न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला.
डाबर कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असल्याचं नाकारलं आहे. त्यांनी त्याच बॅचचे सॅम्पल प्रिझर्व्ह करून ठेवले आहेत. त्या सॅम्पलने सर्व क्वालिटी चेक पास केले आहेत. या बॅचचे जवळपास एक लाख युनिट विकले गेले आहेत मात्र इतर कोणाकडूनही तक्रार आलेली नाही. ज्या दुकानातून हे पॅक विकले गेले त्या दुकानदाराने देखील ज्युस पॅक सील असल्यामुळं कोणताही दोष असेल तर त्याची जबाबदारी डाबर कंपनीची आहे आमची नाही असं सांगितलं.
दरम्यान, जिल्हा ग्राहक न्यायालय अध्यक्ष हिमान्शू मिश्रा आणि सदस्या आरती सूद, नारायण ठाकूर या बेंचने ज्युस पॅक सील करून ते सरकारी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवलं. लॅबने या पॅकमध्ये बुरशी धरली होती याची पुष्टी केली. हा ज्युस पॅक मानवाच्या दृष्टीकोणातून हानीकारक असल्याचं सांगितलं. या सर्व तपासणीचं व्हिडिओ शुटिंग देखील करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने हे पुरावे ग्राह्य मानले.
ग्राहक न्यायालयाने, 'बचाव पक्ष सर्टिफाईड लॅबचे निष्कर्ष नाकारू शकत नाही. कन्ट्रोल सॅम्पल्स हे परफेक्ट, स्पॉटलेस लॅब कंडिशनमध्ये ठेवण्यात आले होते. जी बॉटल ग्राहकाला विकण्यात आली त्यामध्ये फॅक्टरी प्रोडक्शनवेळी प्रिझरवेशन मेथड, सिलिंग क्वालिटी, स्टेरलाईजेशन प्रोसेस त्रुटी राहिल्याचं स्पष्ट होतं.' असा निष्कर्ष नोंदवला.
त्यामुळं याची सर्व जबाबदारी डाबर या कंपनीची असून रिटेल व्यापाऱ्याने या सील पॅकसोबत कोणती छेडछाड केल्याचे पुरावे नाहीत. या बाधित ज्युसमुळं धार्मिक आणि भावनिक हानी झाली आहे. बुरशीयुक्त ज्युस पिल्यामुळं पीडित व्यक्तीचा उपवास मोडला आहे. त्यामुळं त्यांना गंभीर भावनिक, धार्मिक आणि मानसिक वेदना झाल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झाला. हे नुकसान फक्त एक रिप्लेसमेंट बॉटल पाठवून भरून येणारे नाही.
न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणात फक्त डाबर वरच ठपका ठेवला आणि सर्व जबाबदारी त्यांच्यावर निश्चित केली. ग्राहक न्यायालयाने कंपनीला पीडित पटियाल यांना ६० हजार रूपये नुकसान भरपाई, १० हजार रूपये कायदेशीर प्रक्रियेचा खर्च आणि ३० हजार रूपये जिल्हा ग्राहक न्यायालय फंडात जमा करण्याचे आदेश दिले. डाबर कंपनीला ही रक्कम ४५ दिवसाच्या आत द्याची आहे. जर कंपनी ६० हजार रूपये देण्यास असमर्थ राहिली तर त्याच्यावर तक्रार दाखल झाल्यापासून ९ टक्के वार्षिक व्याज लागू राहील.