Crime News
अहमदाबाद: काँग्रेस खासदार शक्तीसिंह गोहिल यांचा पुतण्या यशकुमारसिंह याने आपल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पत्नी राजेश्वरीची हत्या केल्यानंतर यशकुमारसिंहने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. अहमदाबाद पोलिसांनी या प्रकरणात 'अपघाती गोळीबाराचा' दावा फेटाळून लावत यशकुमारसिंहविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वस्त्रापूर भागातील जजेस बंगलो रोडवरील 'एनआरआय टॉवर'मध्ये हे दांपत्य राहत होते. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. २१ जानेवारीच्या रात्री या दोघांचेही मृतदेह त्यांच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले होते. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची नोंद 'अपघाती मृत्यू' अशी केली होती, मात्र फॉरेन्सिक अहवालाने या प्रकरणाला वेगळेच वळण दिले आहे.
डीसीपी हर्षद पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी मिळालेल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमध्ये केवळ दोनच गोळ्या होत्या आणि त्या दोन्ही झाडल्या गेल्या होत्या. "पहिली गोळी राजेश्वरीच्या डोक्यात मारण्यात आली, त्यानंतर यशकुमारसिंहने स्वतःला संपवले. रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर जाणीवपूर्वक दाबल्याशिवाय गोळी सुटूच शकत नाही, त्यामुळे हा अपघात असण्याची शक्यता तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे," असे पोलिसांनी स्पष्ट केले.
तपासात असे समोर आले आहे की, घटनेच्या दिवशी हे दांपत्य एका नातेवाईकाकडे जेवायला गेले होते. तिथून परतल्यावर घराखालीच त्यांनी ज्यूस पिला आणि त्यानंतर ते फ्लॅटमध्ये गेले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स जप्त केले आहेत.
एफआयआरमधील माहितीनुसार, पत्नीवर गोळी झाडल्यानंतर यशकुमारसिंहने स्वतः १०८ रुग्णवाहिकेला फोन केला होता. त्यानंतर काही वेळातच यशकुमारसिंहने त्याच रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आपले जीवन संपवले. हत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस यशकुमारसिंहच्या नातेवाईकांची चौकशी करत आहेत.