Cockroach Janta Party Protest: नीट परीक्षा, शैक्षणिक व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टीने पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी 20 जून रोजी दिल्लीत आणखी मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. या घोषणेमुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारवरील दबाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे 6 जून रोजी झालेल्या आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादानंतर अभिजित दीपके यांनी ही घोषणा केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या पुण्यातही आंदोलन सुरू असून त्यात पुणे विद्यापीठातील विद्यार्थी तसेच एमपीएससी आणि यूपीएससीची तयारी करणारे अनेक तरुण सहभागी झाले आहेत. लवकरच पुढील आंदोलनाची सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दीपके म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात झाल्यानंतर अनेकांनी हा केवळ सोशल मीडियावरील ट्रेंड असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात कोणीही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार नाही, अशी टीकाही करण्यात आली होती. मात्र 6 जून रोजी जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले. त्यामुळे हे केवळ ऑनलाइन आंदोलन नसून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठीचे आंदोलन असल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी अभिजित दीपके यांनी देशभरातील पालकांनाही भावनिक आवाहन केले. "तुमची मुलं सरकारला प्रश्न विचारत असतील, अन्यायाविरोधात बोलत असतील किंवा राजकारणावर मत व्यक्त करत असतील, तर त्यांना रोखू नका," असे ते म्हणाले. त्यांनी स्वतःच्या आईचाही उल्लेख केला. "माझ्या आईलाही माझी काळजी वाटते. मला अटक होईल किंवा माझ्यावर हल्ला होईल, अशी भीती ती व्यक्त केली होती. पण कोणीतरी बोललं पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत, हे मी तिला सांगितलं," असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांना धीर देताना दीपके म्हणाले की, "जर मी एकटाच आवाज उठवला तर तो दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण लाखो विद्यार्थी एकत्र आले, तर त्यांचा आवाज कोणीही दाबू शकणार नाही. तुरुंगात जायची वेळ आली तर मी जाईन, पण विद्यार्थ्यांवर अशी वेळ येऊ देणार नाही."
दरम्यान, 20 जूनला होणारे आंदोलन हे यापूर्वीच्या आंदोलनांपेक्षाही मोठे असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय पातळीवर चर्चा घडवून आणण्यासाठी आणि शैक्षणिक व्यवस्थेतील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
आता 20 जूनच्या आंदोलनाकडे विद्यार्थी, पालक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि त्याचे काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.