UP School student death File Photo
राष्ट्रीय

UP School student death: शाळेबाहेर विसर्जन मिरवणुकीतील DJ चा दणदणाट; दुसरीतील विद्यार्थिनीचा मृत्यू, वर्गात नेमकं काय घडलं?

गणेश विसर्जनाची मिरवणूक शाळेबाहेरून जात असताना मोठ्या आवाजात वाजणाऱ्या डीजेच्या आवाजामुळे दुसरीतील विद्यार्थिनीचा वर्गातच मृत्यू झाल्याची घटना बलरामपूर येथील शाळेत घडली.

मोहन कारंडे

UP School student death

लखनौ : गणेश विसर्जनाची मिरवणूक शाळेबाहेरून जात असताना मोठ्या आवाजात वाजणाऱ्या डीजेच्या आवाजामुळे अस्वस्थ झालेल्या दुसरीतील विद्यार्थिनीचा वर्गातच मृत्यू झाल्याची घटना बलरामपूर येथील डिव्हाइन पब्लिक स्कूलमध्ये घडली.

विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी डीजेच्या तीव्र आवाजामुळे आणि कंपनांमुळे तिची प्रकृती बिघडल्याचा दावा केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण तपासणी आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

ही घटना सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजता घडली. ही मुलगी शाळेच्या पहिल्या मजल्यावरील वर्गात शिकत होती. त्याचवेळी शाळेबाहेरून गणेश विसर्जनाची मिरवणूक जात होती. या मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे सुरू होता. घटनेनंतर शाळेतील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सुमारे तीन मिनिटे दोन सेकंदांच्या या फुटेजमध्ये मिरवणुकीतील मोठ्या आवाजाचे संगीत शाळेच्या वर्गात ऐकू येत असल्याचे दिसते. आवाजामुळे काही विद्यार्थी खिडक्या आणि दरवाजाजवळ गेले, तर संबंधित विद्यार्थिनी अस्वस्थ होत असल्याचे फुटेजमध्ये दिसत असल्याचे शाळेने सांगितले.

‘तीन वेळा त्रास झाला’ असा कुटुंबीयांचा दावा

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थिनीला तीन वेळा अचानक त्रास झाला. तिसऱ्यांदा तिची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावली. डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे तिला हृदयाशी संबंधित त्रास झाला आणि त्यातून तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, या दाव्याला अद्याप वैद्यकीय दुजोरा मिळालेला नाही.

वर्गात नेमकं काय घडलं? शिक्षिकेने काय सांगितलं?

शाळेतील शिक्षिकेने सांगितले की, डीजेचा आवाज इतका मोठा होता की वर्गाच्या खिडक्यांच्या काचा हादरत होत्या. काही विद्यार्थी डीजेच्या आवाजामुळे उठून नाचू लागले. त्याचवेळी एका विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. एका शिक्षिकेने तातडीने तिच्याकडे धाव घेतली आणि तिला खाली आणण्यात आले. त्यानंतर तिला रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. शाळेचे व्यवस्थापक आशीष उपाध्याय यांनीही ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगितले. मिरवणुकीसोबत असलेल्या डीजेचा आवाज अत्यंत मोठा असल्याचे त्यांनी म्हटले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजसह अन्य बाबींची तपासणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT