CJP protest Delhi : नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून संसदेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर जोरदार लाठीमार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. या चकमकीत अनेक आंदोलक जखमी झाले असून, पोलिसांनी जंतर-मंतर येथील आंदोलकांचे मंच आणि तंबू उखडून टाकत परिसर रिकामा केला आहे. दरम्यान, निदर्शकांशी झालेल्या संघर्षात ५० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.
फिरोज शाह रोडवर आंदोलकांनी दिल्ली पोलिसांच्या जवानांवर दगडफेक केली. यादरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. 'सीजेपी'च्या (CJP) या आंदोलनामुळे मध्य दिल्लीतील अनेक भागांत प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कनॉट प्लेसमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जनपथ, संसद मार्ग आणि रायसीना रोडवर अजूनही ३० ते ४० हजार आंदोलक जमा आहेत.
आंदोलकांनी जनपथवर जोरदार दगडफेक केली आहे. येथे पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात असून लाठीमार केला जात आहे. यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी आणि आंदोलक जखमी झाले आहेत. आंदोलक सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत आहेत.निदर्शकांशी झालेल्या संघर्षात ५० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.
'सीजेपी'चे प्रवक्ते सौरव दास यांनी आता स्पष्ट केले आहे की, अभिजित दीपके यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेले नाही आणि अटकही केलेली नाही. यापूर्वी त्यांनी दिल्ली पोलिसांनी दीपके यांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली होती.
या संपूर्ण कारवाईवर कॉकरोच जनता पार्टीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निःशस्त्र कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीमार केल्याचा आरोप पक्षाने केला आहे. दरम्यान, पक्षाचे नेते अभिजीत दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा आधी करण्यात आला होता, मात्र नंतर पोलीस आणि सीजेपी या दोन्ही बाजूंनी या वृत्ताचा इन्कार केला.
या हायव्होल्टेज ड्राम्यादरम्यान, कॉकरोच जनता पार्टीच्या एका शिष्टमंडळाने भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतली. सीजेपीचे प्रतिनिधी आशुतोष रांका यांनी 'X' (ट्विटर) वर माहिती दिली की, जेपी नड्डा यांनी आंदोलकांच्या मागण्यांवर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला आहे. तसेच जंतर-मंतर आणि आसपासच्या परिसरात आता कोणतीही पोलीस कारवाई होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
सीजेपीच्या ३ मुख्य मागण्या:
१. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची तात्काळ सुटका करण्यात यावी.
२. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
३. NEET-UG २०२६ च्या परीक्षेची तयारी करताना आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची भरपाई मिळावी.
दुसरीकडे, दिल्ली हायकोर्टात गीतांजली अंगमो यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. कोर्टाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीचा (हेल्थ रिपोर्ट) अहवाल मागवला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी, २१ जुलै रोजी निश्चित केली आहे.