Jantar Mantar protest case : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या न्यायालयीन कोठडीत विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी आज (दि. १९) आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होणार आहे.
न्यायालयीन कोठडीतून सुटका व्हावी यासाठी 'सीजेपी'च्या कायदेशीर टीमने विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. अटकेच्या दिवशी जामीनदार उपलब्ध नसल्याने त्यांना सुरुवातीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह जामीनदार हजर करण्यात आले असून त्यांच्या तात्काळ सुटकेची विनंती वकिलांनी केली आहे.
जंतरमंतर हे आंदोलनासाठीचे अधिकृत ठिकाण म्हणून रद्द (Denotified) करण्यात आल्यानंतरच्या दिवशी, म्हणजेच १३ ऑक्टोबर रोजी दास आणि रांका यांनी तिथे प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना १३ ऑक्टोबरला ताब्यात घेण्यात आले आणि १४ ऑक्टोबरला ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.या ठिकाणी आपण केवळ राष्ट्रध्वज फडकावला आणि घोषणाबाजी केली, असा दावा 'सीजेपी'च्या नेत्यांनी केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेविरोधात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या प्रक्रियेमुळे मतदारांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीने केला आहे.