CJP Nationwide Protest Against Gyanesh Kumar From October 2:
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेवरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनाची घोषणा केली आहे.
अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी (25 सप्टेंबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, ज्ञानेश कुमार यांनी शनिवारपर्यंत राजीनामा दिला नाही, तर 2 ऑक्टोबरपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलनाला सुरुवात केली जाईल. त्यानंतर हे आंदोलन देशातील विविध शहरांमध्ये नेले जाईल. गांधी जयंतीच्या दिवशी लोकशाहीच्या रक्षणासाठी संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यापूर्वी गुरुवारी (24 सप्टेंबर) अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी पत्रकार परिषद घेत ज्ञानेश कुमार यांना 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, त्यांच्याविरोधात कारवाई सुरू करावी, SIR प्रक्रिया थांबवावी आणि जानेवारी 2025 मधील मतदार यादी पूर्ववत करावी, अशा मागण्या CJP कडून करण्यात आल्या आहेत. तसेच निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याची आणि 2023 मधील संबंधित कायदा रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
CJP ने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसोबतच देशव्यापी ‘इलेक्शन कमिशन ठीक करो’ अभियान सुरू करण्याची घोषणा केली आहे. 48 तासांत राजीनामा न दिल्यास देशव्यापी आंदोलन आणि दिल्लीत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला होता.
दरम्यान, 23 सप्टेंबर रोजी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. या अहवालानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी मागील 10 महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर किमान 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवले. मतदार यादीत नावांची भर घालणे, नावं वगळणे, फॉर्म-6 मधील बदल तसेच मतदार यादीशी संबंधित डेटाच्या व्यवस्थापनावर आक्षेप घेतला आहे.
या अहवालानंतर विरोधी पक्षांकडून ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. काही विरोधी पक्षांनी त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी केली असून, संसदेत त्यांना हटवण्यासाठी प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना आयोगातील वेगवेगळी मते आणि निरीक्षणे ही संस्थेच्या निर्णयप्रक्रियेचा भाग असल्याचे म्हटले आहे. लेखी नोंदी, तांत्रिक सूचना आणि अंतर्गत तपासणी ही नियमित प्रक्रिया असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे SIR प्रक्रियेवरून सुरू झालेला वाद आता निवडणूक आयोगाच्या अंतर्गत कार्यपद्धती, मतदार यादी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचला आहे. CJP ने 2 ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलनाची घोषणा केल्याने पुढील काळात हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.