CJP Jantar Mantar Protest Pudhari
राष्ट्रीय

CJP Delhi Protest: अभिजीत दीपकेला ताब्यात घेतल्यानंतर अजिंक्य शिंदे आंदोलनाचं नेतृत्व करणार; CJPची मोठी घोषणा

CJP Jantar Mantar Protest: दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनापूर्वी अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतल्याचा दावा कॉकरोच जनता पार्टीने (CJP) केला आहे.

Rahul Shelke

CJP Jantar Mantar Protest: दिल्लीतील जंतरमंतर येथे होणाऱ्या आंदोलनापूर्वी कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतल्याचा दावा पक्षाने केला आहे. त्यांच्यासोबत सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे CJPने म्हटले आहे. या कारवाईनंतर आंदोलनाचे नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर पक्षाने भूमिका स्पष्ट केली असून, अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका ताब्यात असेपर्यंत संघटनेचे प्रभारी अजिंक्य शिंदे हे जंतरमंतरवरील आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचे CJPने जाहीर केले आहे.

अजिंक्य शिंदे आंदोलनाची धुरा सांभाळणार

अभिजीत दीपके यांच्या अनुपस्थितीत आंदोलन थांबणार नसल्याचे संकेत CJPने दिले आहेत. पक्षाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनुसार, दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका होईपर्यंत अजिंक्य शिंदे आंदोलनाचे नेतृत्व करतील. त्यामुळे दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनाची पुढील दिशा आणि त्याला मिळणारा प्रतिसाद याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अभिजीत दीपके यांना संभाव्य अटकेची शक्यता वाटत असल्याने त्यांनी आदल्या रात्रीच एक व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला होता, असेही CJPने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतही आंदोलनाबाबत पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची तयारी करण्यात आली होती, असे या पोस्टवरून दिसते.

दिल्ली विमानतळावर घेतले ताब्यात

CJPने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यानंतर या तिघांना अज्ञात ठिकाणी नेण्यात आल्याचेही पक्षाने म्हटले आहे.

मात्र, या तिघांना नेमके कोणत्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे, त्यांना कोणत्या कारणासाठी ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याविरोधात कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नाही.

वकिलांशी संपर्क करू दिला जात नसल्याचा आरोप

अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना वकिलांशी संपर्क साधू दिला जात नसल्याचा गंभीर आरोपही CJPने केला आहे. तिघांना इतरांशी संपर्क साधण्यापासून रोखण्यात आल्याचे पक्षाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या परिस्थितीवर संताप व्यक्त करत CJPने, “WHY NOT JUST DECLARE AN EMERGENCY?” असा सवाल उपस्थित केला. म्हणजेच, “मग थेट आणीबाणीच का जाहीर करत नाही?” अशा शब्दांत पक्षाने या कारवाईवर टीका केली आहे.

जंतरमंतरवरील आंदोलनाकडे लक्ष

अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचा दावा समोर आल्यानंतर जंतरमंतरवरील आंदोलनाचे काय होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अजिंक्य शिंदे नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे CJPने जाहीर केल्याने आंदोलन पुढे सुरू ठेवण्याचा पक्षाचा निर्धार असल्याच दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT