सरन्यायाधीश (CJI) सूर्य कांत.  file photo
राष्ट्रीय

CJI Surya Kant | 'सूर्यकुमारकडून डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजीची अपेक्षा नसते': सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी दिला क्रिकेटचा दाखला

CJI Surya Kant speech |नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना दिला मोलाचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

सरन्यायाधीश (CJI) सूर्य कांत यांनी विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी 'विशेष नैपुण्य'चे महत्त्व पटवून दिले.

CJI Surya Kant speech

गांधीनगर : "खेळात प्रत्येक खेळाडूची भूमिका स्पष्ट असणारा संघच यशस्वी होतो. आपल्या भारतीय क्रिकेट संघात डेथ ओव्हर्समध्ये सूर्यकुमार यादवने गोलंदाजी करावी किंवा धावांचा पाठलाग करताना जसप्रीत बुमराहने आघाडी सांभाळावी, अशी अपेक्षा कोणीही करत नाही; त्याचप्रमाणे वकिलांनीही प्रत्येक क्षेत्रात निष्णात होण्याचा अट्टाहास धरू नये," अशा शब्दांमध्ये सरन्यायाधीश (CJI) सूर्य कांत यांनी विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी 'विशेष नैपुण्य'चे महत्त्व पटवून दिले.

सरन्‍यायाधीशांनी क्रिकेटच्या उदाहरणातून दिला मोलाचा संदेश

गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या (GNLU) १६ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी क्रिकेट आणि वकिली क्षेत्राची रंजक तुलना केली. ते म्हणाले, "यशस्वी संघ हा खेळाडूंच्या स्पष्ट भूमिका आणि त्यांच्यातील ताकदीवर उभा असतो. सूर्यकुमार यादवने शेवटच्या षटकांत गोलंदाजी करावी किंवा बुमराहने धावांचा पाठलाग करताना फलंदाजीची धुरा सांभाळावी, अशी अपेक्षा कोणीही बाळगत नाही. वकिली क्षेत्रातही हेच तत्त्व लागू होते. सुरुवातीच्या काळातच आपण कोणत्या विषयात आणि क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतो, हे ओळखून त्यावर आपली ओळख निर्माण करणे आवश्यक आहे."

सर्वगुणसंपन्न होण्यापेक्षा 'विशेष नैपुण्य' महत्त्वाचे

वकिलीचा पेशा अशा लोकांना फारसे महत्त्व देत नाही जे सर्व गोष्टी एकाच वेळी सारख्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक वकिलाने आपली नेमकी क्षमता कशात आहे, हे ओळखून त्या क्षेत्राभोवती स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

दिखावा नको, मूळ कौशल्यावर लक्ष केंद्रित करा

जे वकील 'दिखावा' करणे थांबवून आपल्या मूळ कौशल्यावर लक्ष केंद्रित करतात, तेच व्यवसायात अधिक आत्मविश्वासाने काम करू शकतात. हा प्रश्न करिअरच्या पहिल्या किंवा तिसऱ्या वर्षी सुटणारा नाही, पण स्वतःला हा प्रश्न वारंवार विचारणे गरजेचे आहे की आपण नेमके कुठे फिट बसतो, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

विश्वसनीयता हीच खरी कमाई

सरन्यायाधीशांनी नमूद केले की, "मोठे वकील सर्व काही एकाचवेळी साध्‍य केल्‍याने उच्च पदावर पोहोचलेले नाहीत. हा व्यवसाय तुमच्याकडून रोज नव्या यशाची अपेक्षा करत नाही, तर कठीण काळात तुमच्या विश्वसनीयतेची मागणी करतो. तुमची हीच विश्वासार्हता भविष्यात तुम्ही कसे वकील बनाल, हे ठरवते," असेही सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी स्पष्ट केले.

व्यावसायिक वास्तव आणि नीतिमत्ता

पुस्तकी ज्ञान आणि न्यायालयीन वास्तव यामध्ये मोठी तफावत असल्याचे सांगताना सरन्यायाधीश म्हणाले की, "पाठ्यपुस्तके केवळ तत्त्वे शिकवतात; परंतु प्रत्यक्ष सराव हा शिस्त, जबाबदारी आणि मर्यादांमध्ये राहून काम करण्याची परीक्षा घेणारा असतो. हे एखाद्या नकाशाचा अभ्यास करणे आणि प्रत्यक्ष जमिनीवर प्रवास करणे यातील फरकासारखे आहे." वकिली व्यवसायातील पडद्यामागील कष्टांवर प्रकाश टाकताना त्यांनी नमूद केले की, संशोधन आणि मसुदा तयार करणे या कामांना त्वरित प्रसिद्धी मिळत नाही, परंतु हेच काम भविष्यातील यशाचा पाया असते.

'सत्यं वद, धर्मं चर'

भाषणाचा समारोप करताना त्यांनी तैत्तिरीय उपनिषदातील "सत्यं वद, धर्मं चर" (सत्य बोला आणि धर्माचे/कर्तव्याचे आचरण करा) या सूत्राचा उल्लेख केला. वकिली व्यवसायाचा नैतिक पाया याच तत्त्वावर उभा असल्याचे त्यांनी सांगितले. वकिली क्षेत्रात दररोज काहीतरी असामान्य करण्याची गरज नसते, तर कठीण प्रसंगात तुम्ही किती विश्वासार्ह आहात, यावरूनच तुमची खरी ओळख निर्माण होते, असा मोलाचा सल्लाही सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी विद्यार्थ्यांना दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT