China on Arunachal Pradesh
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशमधील 27 ठिकाणांना नवीन नावे देण्याचा चीनचा ताजा प्रयत्न भारताने ठाम शब्दांत फेटाळला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की, "नावं बदलल्याने भौगोलिक वस्तुस्थिती बदलत नाही, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील."
चीनच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने 11 ते 12 मे 2025 रोजी अरुणाचल प्रदेशमधील 27 ठिकाणांची 'नवीन नावे' प्रसिद्ध केली होती. यानंतर दोन दिवसांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “चीनकडून भारतीय राज्य असलेल्या अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांना नवीन नावे देण्याचे निरर्थक व हास्यास्पद प्रयत्न सुरूच आहेत. आमच्या ठाम भूमिकेनुसार, आम्ही अशा प्रयत्नांना स्पष्टपणे नाकारतो.”
मंत्रालयाने पुढे नमूद केले आहे की, “कल्पनाशक्तीने ठेवलेली नावे वास्तव बदलू शकत नाहीत. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आणि घटक राज्य आहे आणि तो नेहमीच राहणार आहे.”
यापूर्वीही चीनने अरुणाचल प्रदेशातील भूप्रदेशांवर दावा सांगत ‘प्रमाणित नावे’ (standardised names) जाहीर केली होती. एप्रिल 2024 मध्ये चीनने अरुणाचल प्रदेशातल्या 30 ठिकाणांची नावे बदलली होती.
त्याची चौथी यादी प्रसिद्ध केली होती. यामध्ये अरूणाचल प्रदेशमधील 12 डोंगर, 4 नद्या, 1 सरोवर, 1 पर्वतमार्ग, 11 वसाहती आणि 1 भूभाग यांचा समावेश होता.
याआधी 2017 मध्ये चीनने 6 ठिकाणांची नावे बदलण्याची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर 2021 मध्ये 15 ठिकाणे आणि 2023 मध्ये 11 ठिकाणांची नावे बदलण्याचे प्रयत्न झाले.
चिनी सरकारी प्रसारमाध्यम Global Times ने दिलेल्या माहितीनुसार, चीन अरुणाचल प्रदेशाला ‘झांगनान’ (Zangnan) म्हणून ओळखतो आणि या नावांमागे त्याचा भू-राजकीय दावा आहे.
चीनने या नव्या यादीसोबत अचूक अक्षांश-रेखांश आणि उच्च-रिझोल्यूशन नकाशाही प्रसिद्ध केला आहे.
भारत सरकारने चीनच्या या सर्व प्रयत्नांना नेहमीच स्पष्टपणे नाकारले आहे. भारताने वारंवार सांगितले आहे की, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि चीनकडून काल्पनिक नावे देऊन त्या भूमीवर दावा सांगणं हे अवैध आणि अमान्य आहे.