Husband kills Pregnant wife with hacksaw blade Chhattisgarh
रायपूर: एका दारुड्या पतीने किरकोळ वादातून आपल्या २३ वर्षीय गर्भवती पत्नीला जबर मारहाण केली आणि तिच्या गुप्तांगात हेक्सा ब्लेड खुपसून तिची निर्घृण हत्या केली. छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यात ही संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपी पतीला अटक केली असून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ही घटना १४ मे रोजी मणीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिट्ठीकाला गावात घडली. हिराबाई अरिया असे, मृत पत्नीचे नाव असून प्रदीप अगरिया असे आरोपी पतीचे नाव आहे. प्रदीप आणि हिराबाई यांचा विवाह पाच वर्षांपूर्वी झाला होता. प्रदीपला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या नशेत सतत हिराबाईला मारहाण करत असे. १४ मे रोजी त्यांच्यात वाद झाला. यावेळी नशेत धुंद असलेल्या प्रदीपने हिराबाईला बेदम मारहाण केली. क्रूरतेची सीमा पार करत तिच्या गुप्तांगात लोखंडी हेक्सा ब्लेड खुपसले. धक्कादायक म्हणजे, जेव्हा हे क्रूरकृत्य सुरू होते, तेव्हा त्यांची चार वर्षांची मुलगी घरातच होती.
अमानुष मारहाणीमुळे हिराबाई बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपी प्रदीपने गुन्हा लपवण्यासाठी तिला दुचाकीवर बसवून अंबिकापूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेले. तिथे त्याने डॉक्टरांना सांगितले की, हिराबाई रस्ता अपघातात जखमी झाली आहे. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले. पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपी प्रदीप रुग्णालयातून पसार झाला.
नातेवाईक उपस्थित नसल्यामुळे मृतदेह शवगृहात ठेवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी नातेवाईक पोहोचल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. अंबिकापूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे सर्जन डॉ. संतु बाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हिराबाई ही तीन महिन्यांची गर्भवती होती. तिच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा होत्या. तपासणी दरम्यान तिच्या गुप्तांगातून सुमारे १० इंच लांबीचे लोखंडी पाते बाहेर काढण्यात आले.
शवविच्छेदन अहवालात हिराबाईचा मृत्यू अपघाताने नव्हे तर क्रूर मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मणीपूर पोलिसांनी रविवारी आरोपी पतीला अंबिकापूर येथून अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.