

Crime News
राजकोट: गरिबी आणि लाचारीचा फायदा घेत माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातून समोर आली आहे. अवघे दोन हजार रुपयांचे घरभाडे थकल्यामुळे एका नराधम पतीने स्वतःच्या पत्नीला आणि १३ वर्षांच्या निष्पाप मुलीला घरमालक आणि त्याच्या नातेवाईकाच्या हवाली केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम पतीसह घरमालकाला अटक केली असून न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
हा अंगावर काटा आणणारा प्रकार पीडित पत्नीच्या आईने पोलिसांत धाव घेतल्यानंतर उघडकीस आला. १ मे रोजी मोरबी शहर ‘ए’ डिव्हिजन पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईने जावई, घरमालक आणि त्याच्या एका नातेवाईकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.
या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या ५५ वर्षीय घरमालकाला गुरुवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मोरबी शहर ‘ए’ डिव्हिजनचे पोलीस निरीक्षक वाय. बी. जाडेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि मुलीच्या नराधम पतीला पोलिसांनी आधीच अटक केली असून तो सध्या तुरुंगात आहे.
हे पीडित कुटुंब सहा महिन्यांपूर्वी रोजगाराच्या शोधात मोरबी येथे आले होते. तिथे त्यांनी महिन्याला २,००० रुपये भाड्याने एक घर घेतले होते. मात्र, पतीच्या व्यवसायात मोठे नुकसान झाल्यामुळे त्याला घराचे भाडे देणे शक्य झाले नाही आणि थकबाकी वाढत गेली.
याच लाचारीचा गैरफायदा घरमालकाने घेतला. आपल्याला घराचे भाडे देणे शक्य होत नसल्यामुळे, कथितरित्या घरमालकाला आणि घरमालकाच्या एका नातेवाईकाला आपली पत्नी व १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची परवानगी दिली. नराधम घरमालकाने पीडित माय-लेकीवर स्वतःच्या घरी, भाड्याच्या घरात आणि टंकारा या ठिकाणी नेऊन वारंवार अत्याचार केले.
पोलिसांनी घटनेच्या ठिकाणाचा पंचनामा केला असून पीडितांची आणि अटक केलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली आहे. या गुन्ह्याशी संबंधित काही पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. दरम्यान, या घृणास्पद गुन्ह्यात मदत करणारे घरमालकाचे कुटुंबीय आणि इतर सहआरोपी सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.