Chhattisgarh Naxal Encounter
बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर- दंतेवाडा येथील जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये बुधवारी चकमक झाली. यात सात नक्षलींना कंठस्नान घालण्यात यश आले असून सुरक्षा दलांमधील दोन जवानही शहीद झाले आहेत. चकमकीत मृत्यू झालेल्या नक्षलींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
बिजापूर- दंतेवाडा सीमावर्ती भागातील गंगलूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. बिजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी माध्यमांना सांगितले की, सकाळी नऊपासून ही चकमक सुरू आहे. आत्तापर्यंत सात नक्षलींचा मृत्यू झाला असून सातही मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. चकमकीच्या ठिकाणाहून एसएलआर रायफल, ३०३ रायफल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
दोन जवान शहीद
चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत. हेड कॉन्स्टेबल मोनू वदादी, कॉन्स्टेबल दुकारू गोंडे अशी या शहीद जवानांची नावे आहेत. दोघेही छत्तीसगड पोलिसांच्या जिल्हा राखीव दलात कार्यरत होते. यात सोमदेव यादव हा जवानही जखमी झाला आहे. सध्या सोमनाथ यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गंगलूर संवेदनशील क्षेत्र
गंगलूर हा नक्षलवादाच्या दृष्टीने संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. बुधवारी या भागात लपून बसलेल्या नक्षलींना सुरक्षा दलांनी वेढा टाकला. ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी शक्यताही अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
नक्षली कमांडर पापा रावला हादरा
ज्या भागात चकमक झाली त्या परिसरात नक्षली कमांडर पापा रावचे वर्चस्व आहे. बुधवारी छत्तीसगड पोलिसांचं जिल्हा राखीव दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि अन्य सुरक्षा दलांचे संयुक्त पथक गंगलूरच्या जंगल परिसरात शोधमोहीम राबवत होते. यादरम्यान, नक्षलींनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. याला सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. मृत नक्षलींचा आकडा पाहता कमांडर पापा रावच्या वर्चस्वाला हादरा बसल्याचे दिसते.
छत्तीसगडमध्ये वर्षभरात 268 नक्षलींचा मृत्यू
छत्तीसगडमध्ये वर्षभरात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत आत्तापर्यंत 268 नक्षलींचा मृत्यू झाला. यातील 239 नक्षली हे बस्तर विभागातील आहे. बस्तर विभागात बिजापूर, दंतेवाडा अशा एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो. बुधवारी ज्या भागात चकमक झाली तो भाग दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर असून याच भागात गेल्या काही महिन्यांपासून नक्षलविरोधी मोहीम सुरू आहे.