पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा. (PTI fIle photo)
राष्ट्रीय

OBC 'क्रीमी लेयर'बाबत केंद्र मोठ्या निर्णयाच्या तयारीत; आरक्षणाचा फॉम्युर्ला बदलणार, जाणून घ्या कोणावर होईल परिणाम?

आरक्षणात उत्पन्न मर्यादा बदलण्याची शक्यता आहे

दीपक दि. भांदिगरे

OBC creamy layer

केंद्र सरकार ओबीसी प्रवर्गाअंतर्गत विविध वर्गांना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी क्रिमी लेयरच्या उत्पन्न मर्यादेत एकसमानता आणण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत असल्याचे समजते. असे केल्यानं अनेक प्रकारच्या केंद्रीय आणि राज्य सरकारी संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, विद्यापीठे आणि अन्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळविण्यासाठी क्रिमी लेयरची उत्पन्न मर्यादा समान ठेवली जाईल. याबाबतचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

याबाबत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, शिक्षण, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT), कायदेशीर व्यवहार, कामगार आणि रोजगार, सार्वजनिक उपक्रम, नीती (NITI) आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोग (NCBC) यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे समजते.

१९९२ मध्ये इंदिरा साहनी विरुद्ध भारतीय संघराज्य खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर, ज्याला मंडल निकाल म्हटले जाते, आरक्षण धोरणात ओबीसींमध्ये 'क्रीमी लेयर' ही संकल्पना मांडण्यात आली. १९९३ मध्ये जे सरकारी नोकरीत नाहीत, अशांसाठी 'क्रिमी लेयर' मर्यादा वार्षिक १ लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. त्यात २००४, २००८, २०१३ मध्ये बदल करण्यात आला. २०१७ मध्ये, उत्पन्न मर्यादा वार्षिक ८ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. ही उत्पन्न मर्यादा तेव्हापासून आहे तशीच लागू आहे.

OBC क्रिमी लेयरमध्ये कोण आहे?

'क्रीमी लेयर' म्हणजे ओबीसींमधील गट जसे की संवैधानिक पदांवर असलेल्या व्यक्ती; अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि राज्य सेवा गट-अ/वर्ग-१ अधिकारी; केंद्र आणि राज्याचा गट-ब/वर्ग-२ सेवा; सार्वजनिक उपक्रमांतील कर्मचारी (PSU); सशस्त्र दलांतील अधिकारी; व्यावसायिक आणि व्यापार आणि उद्योगातील व्यक्ती; मालमत्तेचे मालक.

काही केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांमधील समानतेबाबतचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला असला तरी, तो अद्याप खासगी क्षेत्रातील विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आणि राज्य सरकारांच्या विविध संस्थांमध्ये प्रलंबितच आहे.

'क्रिमी लेयर'मध्ये समानता का हवी आहे?

मंडल आयोगाच्या शिफारशींनुसार, 'नॉन-क्रिमी' लेयरच्या ओबीसींना केंद्र सरकारमधील नोकरीसाठी आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांसाठी २७ टक्के आरक्षण देण्याची व्यवस्था आहे. पण राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची ही मर्यादा वेगवेगळी आहे. क्रिमी लेयरसाठी उत्पन्नाची मर्यादा एकसमान नसल्याने क्रिमी लेयर श्रेणीत येणाऱ्या ओबीसींना या आरक्षणाचा लाभ मिळत नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, विद्यापीठांमधील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापकसह शिक्षक कर्मचाऱ्यांच्या पगाराची पातळी सामान्यतः १० आणि त्याहून अधिक अशी असते. जी सरकारच्या गट-अ पदांच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने अथवा त्याहूनही अधिक असते. या पार्श्वभूमीवर या पदांना 'क्रीमी लेयर'च्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव आहे. याचाच अर्थ त्यांच्या मुलांना ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. खासगी क्षेत्रात, पदांच्या श्रेणी आणि वेतन आणि भत्त्यांच्या श्रेणी लक्षात घेता, त्यांच्यात समानता राखणे कठीण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उत्पन्न/मालमत्ता निकषांवर आधारित हे निश्चित केले जाऊ शकते, असा प्रस्ताव विचाराधीन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT