

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा गट-ब या संवर्गातील पदभरती मराठा (कुणबी) उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भरती प्रक्रियेसाठी मराठा जातीच्या उमेदवारांना कुणबी दाखला मिळाल्यास इतर मागासवर्गाचा दावा करण्याचा विकल्प आयोगाने उपलब्ध करून दिला आहे. तसे शुद्धिपत्रकच ‘एमपीएससी’द्वारे जाहीर करण्यात आले आहे.
या भरतीअंतर्गत एकूण 65 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर 27 जूनपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 जुलै 2025 पर्यंत असणार आहे. (Latest Pune News)
शासन निर्णय 28 मे 2024 नुसार, अराखीव किंवा आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज सादर करणार्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे ओबीसी जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा ओबीसी दावा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ज्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, अशा उमेदवारांनी इतर मागास वर्गाचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणे आवश्यक असल्याचे जाहिरातीमध्ये म्हटले आहे.
संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलमधील सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरीता उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकसमोर दर्शविण्यात आलेल्या क्वेशन या बटनावर क्लिक करावे आणि विचारण्यात येणारी माहिती नमूद करून विकल्प सादर होतील.
सामाजिक व शैक्षणिकद़ृष्ट्या मागासवर्ग तसेच इतर मागासवर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल. सामाजिक व शैक्षणिकद़ृष्ट्या मागासवर्गाचा तसेच इतर मागासवर्गाचा विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटकचा लाभ घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले शुद्धिपत्रक उमेदवारांनी पाहणे आवश्यक आहे.