राष्ट्रीय

कुवेतमधील आगीच्या घटनेची केंद्रसरकारकडून गंभीर दखल

करण शिंदे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कुवेतमधील इमारतीला लागलेल्या आगीमध्ये 41 भारतीयांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची केंद्रसरकारने गंभीर दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी याप्रकरणी दुःख व्यक्त केले आहे. तसेच परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंह यांना तातडीने कुवेतला रवाना करण्यात आले आहे.

या दुर्घटनेत केरळ, तामिळनाडू आणि उत्तर भारतातील लोकांचा बळी गेल्याची माहिती अरब टाईम्स या दैनिकाने दिली आहे. आग लागलेली इमारत ही मल्याळी व्यापारी के. जी. अब्राहम यांच्या मालकीची असून या ठिकाणी मजूर भाड्याने खोली घेऊन राहत होते, अशी माहिती कुवेतचे उपपंतप्रधान शेख फहाद यांनी दिली.

मृत्यूमुखी पडलेल्यांचे पार्थिव मायदेशात आणण्यासह जखमींवरील उपचारासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याच्या उद्देशाने किर्तीवर्धन सिंह यांना पंतप्रधानांनी कुवेतला जाण्याचे निर्देश दिल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी दिली. या अपघाताबाबत लवकरच सर्व माहिती समोर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "कुवेत शहरातील आगीच्या दुर्घटनेत प्रियजन गमावल्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. भारतीय दूतावास या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि जखमींना मदत करण्यासाठी तेथील अधिकारी काम करत आहेत." परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही याविषयी दुःख व्यक्त केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेविषयी दु:ख व्यक्त केले आहे. शोकाकुल कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना असून मध्यपूर्वेतील आमच्या कामगारांची स्थिती ही चिंतेची गंभीर बाब असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT