व्हॉट्‌सॲप ‘यूजरनेम फीचर’प्रश्नी ‘मेटा’ला नोटीस pudhari photo
राष्ट्रीय

Meta Notice India : व्हॉट्‌सॲप ‘यूजरनेम फीचर’प्रश्नी ‘मेटा’ला नोटीस

३ दिवसांत स्पष्टीकरण द्या; तोपर्यंत फीचर लाँच न करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने व्हॉटस्‌ॲपवर नवीन ‘यूजरनेम फीचर’ आणण्याच्या तयारीवरून ‘मेटा’ कंपनीला नोटीस बजावली आहे. सरकारने ‘मेटा’ला या ‘यूजरनेम फीचर’ची संपूर्ण माहिती आणि सविस्तर स्पष्टीकरण ३ दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या विषयावरील संपूर्ण चर्चा आणि सल्लामसलत प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे ‘यूजरनेम फीचर’ यूजर्ससाठी रोल आऊट (लाँच) करू नये, असे कडक निर्देशही सरकारने ‘मेटा’ कंपनीला दिले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूजरनेमवर आधारित या व्यवस्थेमुळे लोक मोबाईल नंबर शेअर न करताही एकमेकांशी संपर्क साधू शकतील. मात्र, यामुळे बनावट ओळख निर्माण करून लोकांना फसवण्याची शक्यताही वाढू शकते. तपासणीत डिजिटल सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे समोर आल्यास कंपनीकडे जाब विचारला जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे.

व्हॉटस्‌ॲपने अलीकडेच या फीचरची घोषणा करताना, यूजर्सची गोपनीयता (प्रायव्हसी) अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू केल्याचे म्हटले होते.

फीचरचे वैशिष्ट्य

या नवीन फीचरअंतर्गत प्रत्येक यूजरला आपले एक वेगळे यूजरनेम तयार करता येईल. त्याद्वारे संवाद सुरू करता येईल. कंपनीने यासोबत ‘यूजरनेम-की’ नावाची अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थाही दिली आहे. याअंतर्गत, कोणत्याही नवीन व्यक्तीला केवळ यूजरनेमच्या आधारे पहिल्यांदा संपर्क साधण्यासाठी एका सिक्युरिटी कीची आवश्यकता असेल, जी यूजर कधीही बदलू शकेल.

फसवणुकीचा धोका

या घोषणेनंतर सरकारसोबतच सायबर सुरक्षातज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. बनावट अकाऊंटस्‌ बनवण्यावर व ओळखीची नक्कल करण्यावर प्रभावी बंदी न आल्यास, गुन्हेगार एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीशी, कंपनीशी किंवा ब्रँडशी मिळतेजुळते यूजरनेम तयार करून लोकांची सहज फसवणूक करू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मोबाईल नंबर आवश्यकच; सुरक्षेची काळजी : व्हॉट्‌सॲप

दरम्यान, व्हॉटस्ॲ‌प वापरण्यासाठी यूजर्सना मोबाईल नंबरची आवश्यकता असेलच, असे स्पष्ट केले आहे. तसेच, वापरकर्त्याच्या सुरक्षेसंबंधी काळजी घेण्यात आलेली आहे, असे व्हॉटस्ॲ‌पने म्हटले आहे. यूजरनेम वापरण्याची ही सुविधा अद्याप लाईव्ह झालेली नाही आणि या वर्षाच्या अखेरीस ती हळूहळू सर्वांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. कोणाचीही बनावट ओळख निर्माण होऊ नये म्हणून आम्ही सर्वात हायप्रोफाईल नावे जसे की, सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती, सरकारी संस्था, सेलिब्रिटी, व्हेरिफाईड मेटा अकाऊंटस्‌ राखून ठेवली आहेत. तसेच, यूजरनेमद्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी आम्ही सुरक्षेचे अनेक स्तर तयार केले आहेत. इतर यूजर्सना तुम्हाला मेसेज करण्यासाठी तुमचे अचूक यूजरनेम माहीत असणे आवश्यक असेल, याशिवाय सर्व ती काळजी घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT