CBSE Class 10th Board Exam
सध्या दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. २०२६ पासून दहावीच्या विद्यार्थ्यांना एका शैक्षणिक वर्षात दोनवेळा सीबीएसई बोर्ड परीक्षा देता येईल. पण, फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील परीक्षेस बसणे त्यांना अनिवार्य असेल. याबाबतची माहिती बुधवारी अधिकाऱ्यांनी दिली.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने (CBSE) बुधवारी दहावीची बोर्ड परीक्षा वर्षातून दोनवेळा घेण्यासाठीच्या नियमांना मंजुरी दिली. याबाबतची शिफारस नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० मधून करण्यात आली होती. यामुळे २०२६ पासून दहावीच्या विद्यार्थ्यांना एका शैक्षणिक वर्षात दोनदा सीबीएसई बोर्ड परीक्षा देता येईल, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.
"पहिल्या टप्प्यातील सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारीमध्ये आणि दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा मे महिन्यात घेण्यात येईल. दोन्ही टप्प्यांत घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल अनुक्रमे एप्रिल आणि जूनमध्ये जाहीर केले जातील," असे सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले.
"विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील परीक्षा देणे अनिवार्य असेल. तर दुसरा टप्प्यातील परीक्षा ऐच्छिक असेल. यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान आणि भाषा यापैकी कोणत्याही तीन विषयांतील गुण सुधारण्याचा पर्याय उपलब्ध असेल," असेही त्यांनी पुढे सांगितले.
सीबीएसईने फेब्रुवारीमध्ये याबाबत मसुदा जाहीर केला होता. २०२६ पासून वर्षातून दोनदा दहावी बोर्ड परीक्षा घेण्याच्या नियमावलीचा हा मसुदा होता. त्यावर अभिप्राय मागवण्यात आले होते. हा नवीन बदल ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ च्या शिफारशीनुसार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची संधी देऊन शैक्षणिक दबाव कमी करण्याचा यामागील उद्देश आहे.