

Maharashtra Admission Process 2025
पवन होन्याळकर
मुंबई : दहावी-बारावीच्या निकालाला तब्बल दीड महिना झाला आहे. त्याचबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या काही सीईटींचे निकाल लागून महिना होत आला आहे, तरीही 20 हून अधिक व्यावसायिक अभ्यासक्रमांबरोबरच अकरावी, तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम (पॉलिटेक्निक), आयटीआय आदी अभ्यासक्रमांचा जून महिना संपत आला तरीही ‘कॅप फेरी’तून अद्याप एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश झालेला नाही. यंदाचे शैक्षणिक सत्र कोसळण्याच्या उंबरठ्यावर असून ऑगस्ट, सप्टेंबरमध्येच वर्ग सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्यातील तब्बल 13 लाख मुले प्रवेशासाठी खोळंबून आहेत. सीईटी सेलकडून मार्च-एप्रिलमध्ये तब्बल 18हून अधिक विविध प्रवेश परीक्षा (सीईटी) पार पडल्या आणि त्यांचे निकाल मे महिनाअखेरपर्यंत व जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झाले. मात्र त्या निकालांचा उपयोग अद्याप प्रवेशासाठी झालेला नाही.
अकरावी प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेत यंदा 15 लाख 33 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले, मात्र अकरावी प्रवेशासाठी केवळ 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना आता पहिली फेरी संपल्यानंतरच अर्ज करता येणार आहे. 26 जून रोजी पहिली फेरी जाहीर होणार असून, त्यानंतर प्रवेशासाठी एक आठवडा देण्यात आला आहे.
पॉलिटेक्निक प्रवेशास विलंब
तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीत येणार्या पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमासाठी अर्जाची अंतिम तारीख 16 जून ठेवण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात उशीर होत असल्याने ही तारीख 26 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यत 400 संस्थांमध्ये 1.05 लाख जागांसाठी 1.75 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. गुणवत्ता यादी, कागदपत्र पडताळणी याचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. एआयसीटीईने महाविद्यालय मंजुरीची प्रक्रिया उशिरा असल्याने याचा फटका यंदा या प्रवेशालाही बसणार आहे.
आयटीआयही यंदा उशिरा
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी दोन लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात 419 शासकीय व 588 खासगी संस्थांमध्ये एकूण 1 लाख 54 हजार जागा आहेत. 30 जूनला प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे; तर 9 जुलैला पहिली फेरी जाहीर होणार आहे. तसेच नीट परीक्षेचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला असला, तरीही वैद्यकीय आणि दंत शाखेतील प्रवेश प्रक्रियेची कोणतीही ठोस रूपरेषा एनटीएकडून अद्याप समोर आलेली नाही. महाराष्ट्रात सुमारे 28 हजार वैद्यकीय जागांसाठी 1 लाख 25 हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत.