Anti-Corruption Raid : सरकारी नोकरी आणि भ्रष्टाचार हे भारतीयांसाठी नवं नाही. मात्र नोकरीत रुजू होवून अवघे सहा वर्ष झाल्यानंतर एका महिला अधिकार्याने कोट्यवधीची माया जमवली. तिच्या निवासस्थानासह भाड्याच्या घरात टाकण्यात आलेल्या छाप्यात तब्बल १.०२ कोटी रुपये रोख आणि १ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. लाचखोरीतून एका महिला अधिकार्याने घेतलेल्या कोट्यवधींची उड्डाणे पाहून कारवाई करणार्या अधिकारी अचंबित झाले.
नूपूर बोरा या आसाम सिव्हिल सर्व्हिस (एसीएस) अधिकारी आहेत. सध्या त्या कामरूप जिल्ह्यातील गोरोईमारी येथे सर्कल ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. मूळची गोलाघाटची रहिवासी असलेल्या बोरा २०१९ मध्ये महसूल विभागात रुजू झाल्या; पण सहा महिन्यांनंतरच अनियमित जमीन व्यवहारांच्या आरोप त्यांच्यावर होण्यास सुरुवात झाली. अखेर सोमवार,१५सप्टेंबर रोजी उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली.वादग्रस्त जमीन व्यवहारात सहभागी असल्याच्या तक्रारींनंतर गेल्या सहा महिन्यांपासून बोरा यांच्यावर देखरेख ठेवण्यात आली होती, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले. बारपेटा महसूल मंडळात तैनात असताना या अधिकाऱ्याने पैशाच्या बदल्यात हिंदू जमीन संशयास्पद व्यक्तींना हस्तांतरित केली होती. आम्ही तिच्यावर कठोर कारवाई केली आहे, असे सरमा गुवाहाटी येथील एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले.
नूपूर बोरा यांना अटक केल्यानंतर त्यांच्या गुवाहाटी येथील तिच्या निवासस्थानातून आणि बारपेटा येथील भाड्याच्या घरात छापा टाकण्यात आला. यावेळी तब्बल १.०२ कोटी रुपये रोख आणि १ कोटी रुपयांचे दागिने सापडले. मुख्यमंत्र्यांच्या विशेष दक्षता कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाला गुवाहाटी येथील तिच्या निवासस्थानातून ९२ लाख रुपये रोख आणि १ कोटी रुपयांचे दागिने सापडले. बारपेटा येथील तिच्या भाड्याच्या घरातून आणखी १० लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.
१९८९ मध्ये गोलाघाट येथे जन्मलेल्या नुपूर बोरा यांनी गौहाटी विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी घेतली आहे. नागरी सेवांमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत व्याख्याता म्हणून काम केले होते. २०१९ मध्ये त्यांनी आसाम नागरी सेवा (Assam Civil Service) मध्ये प्रवेश केला आणि कारबी आंगलोंग येथे सहायक आयुक्त म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली. २०२३ मध्ये त्यांची बारपेटा येथे मंडळ अधिकारी म्हणून बदली झाली.
बारपेटा येथे कार्यरत असताना नुपूर बोरा यांनी सरकारी आणि ‘सत्रा’ (Satara) जमिनी बेकायदेशीरपणे 'मिया' (Miya) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संशयित स्थलांतरितांना हस्तांतरित करण्यास मदत केली, असा 'मनीकंट्रोल' वृत्तसंस्थेने अहवाल दिला आहे. मुख्यमंत्री सरमा यांच्या मते, या अधिकाऱ्याने ‘बारपेटा महसूल मंडळात असताना पैशांच्या मोबदल्यात हिंदूंची जमीन संशयास्पद व्यक्तींना हस्तांतरित केली’. दरम्यान, अखिल गोगोई यांच्या नेतृत्वाखालील कृषक मुक्ती संग्राम समितीने (KMSS) यापूर्वीच नुपूर बोरा यांच्या विरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनुसार, त्या जमीन संबंधित कामांसाठी १,५०० ते २ लाख रुपयांपर्यंत लाच घेत होत्या आणि त्यासाठी त्यांनी 'रेट कार्ड'ही तयार केले होते.