

पनवेल शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन वामनराव वायकर आणि त्याचा खासगी साथीदार रवींद्र बुट्टे या दोघांना लाचप्रकरणी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पनवेल शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन वामनराव वायकर (वय 42, पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक - पनवेल शहर पोलीस ठाणे, ता. पनवेल, जिल्हा नवी मुंबई) आणि त्याचा खासगी साथीदार रवींद्र उर्फ सचिन सुभाष बुट्टे (वय 30, कॅमेरा मेकॅनिक, रा. करंजडे, सेक्टर 1, पनवेल) यांना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार (वय 32) यांच्या वडिलांविरुद्ध पनवेल शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यातील तपास अधिकारी म्हणून सचिन वायकर कार्यरत होते. तक्रारदारांना धमकी देत वायकर यांनी गुन्ह्यात आणखी कलमे वाढवून अंतरिम जामिन नामंजूर करून वडिलांना अटक करण्याची भीती दाखवली. ही अटक टाळायची असेल तर 1 लाख रुपयांची लाच देण्याची मागणी त्यांनी केली, अशी तक्रार 21 जुलै 2025 रोजी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली.
तक्रार पडताळणीदरम्यान वायकर यांनी लाच घेण्याची मागणी कायम ठेवली. त्यानंतर विभागाने पनवेलमध्ये सापळा रचला. 21 जुलै 2025 रोजी रात्री साडेअकरा वाजता मारुती कुशन, शिवाजी चौक, जुना पनवेल येथे नियोजन करण्यात आले. तक्रारदाराकडून मागणीप्रमाणे 50 हजार रुपये स्वीकारताना वायकर यांना त्यांच्या व्हॅगनार कारमध्ये, त्याच्या साथीदार रवींद्र उर्फ सचिन बुट्टे याच्या मार्फत, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणात वायकर आणि त्याचा साथीदार या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.