Snakebite
आग्रा: सापाने दंश केल्यानंतर मृत्यू झालेल्या आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्यासाठी आई-वडिलांनी त्याचा मृतदेह तीन दिवस कडुलिंबाची पाने आणि शेणाच्या गोवर्यांमध्ये ठेवला. मुलगा जिवंत होईल या अंधश्रद्धा आणि भाबड्या आशेने मानवी मनाला हेलावून टाकणारी आणि तितकीच धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील हातूरस जिल्ह्यातील हसायन भागात उघडकीस आली आहे. तांत्रिक-मांत्रिकांच्या भूलथापांना बळी पडलेल्या या शोकाकुल कुटुंबाकडून अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. नक्की काय घडले? वाचा सविस्तर...
हसायनमधील इतारणी गावात कपिल जाटव (वय १०) या मुलाचा दिवाळीच्या रात्री (२० ऑक्टोबर) घरी साप चावल्याने मृत्यू झाला होता. त्याला तातडीने स्थानिक सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कपिल हा गावातल्या सरकारी शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत होता.
मुलाचा मृतदेह घरी आणल्यानंतर शोकाकुल कुटुंबाला काही शेजाऱ्यांनी मथुरेतील मांत्रिकामार्फत मुलाला जिवंत करण्याचा सल्ला दिला. त्याच्यावर विश्वास ठेवून कुटुंब मृतदेह घेऊन मथुरेला गेले. मात्र, मांत्रिकाचे विधी निष्फळ ठरले.
शेवटचा अघोरी प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह परत गावात आणला. निराशेच्या भरात त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून मृतदेह कडुलिंबाची पाने आणि शेणाने पूर्णपणे झाकून गावाबाहेर ठेवला. तिथे मांत्रिकांनी त्याला पुन्हा जीवंत करण्यासाठी विधी केले.
कदाचित तो जिवंत होईल या आशेने तीन दिवस कुटुंबातील सदस्य आणि गावकऱ्यांनी त्या मृत मुलाच्या पायांना फांदीने टोचून पाहिले, पण कोणतीही हालचाल न दिसल्याने अखेर गुरुवारी रात्री पोलिसांना याची माहिती देण्यात आली. हसायनचे पोलिस ठाणे प्रभारी गिरीशचंद्र गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस गावात पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.
मुलाचा वडील नरेंद्र जाटव हे रोजंदारी मजूर आहेत. त्यांनी सांगितले, “शुक्रवारी शवविच्छेदन झाले आणि नंतर मुलाचे अंत्यसंस्कार करण्यात आले.” सध्या या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, परंतु अंधश्रद्धेतून झालेल्या या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.