

snake bite:
बेळगाव : तालुक्यातील बेळगुंदी येथील तरुणाने कामावर जाण्याच्या घाईत बूट पायात चढवले. परंतु, बुटात काहीतरी टोचल्यासारखे झाल्याने त्याने बूट काढले. आत बघतो तर चक्क साप वेटोळे घालून बसला होता. त्याने केलेला दंश तरुणाला टोचल्यासारखे वाटले होते. घाबरलेल्या तरुणांने तातडीने जिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेतले तो वाचला, कारण साप बिनविषारी होता. चार दिवसांपूर्वी याच गावात सर्पदंश झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सध्या पावसाने उघडीप दिल्याने व उन्हाचा तडाका वाढल्याने साप सायंकाळच्या वेळी बिळाबाहेर पडत आहेत. परिणामी बेळगाव शहर व तालुका परिसरात सर्पदंशाच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी घराबाहेर ठेवलेल्या बुटांमध्ये, वाहनांमध्ये आणि वस्त्रांमध्ये साप शिरण्याचे प्रकार वाढले आहेत. नुकतीच अशीच एक घटना बेळगुंदी (ता.बेळगाव) येथे घडली असून, बुटात शिरलेल्या सापाने एका तरुणाला दंश केला.
बेळगुंदी येथील उमेश (वय २६) हा तरुण शुक्रवारी सकाळी आपल्या कामानिमित्त बेळगावला जाण्याच्या तयारीत होता. घरासमोर ठेवलेले बूट घालत असताना अचानक त्याच्या पायाला काहीतरी टोचल्यासारखे वाटले. त्याने तात्काळ बूट काढून फेकला असता आतून साप बाहेर आला. या सापाने त्याला दंश केला होता.
घाबरलेल्या उमेशने लगेचच कुटुंबियांच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. डॉक्टरांनी तपासणी केली असता साप बिनविषारी असल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सध्या उमेशची प्रकृती स्थिर असून त्याला आवश्यक उपचार देण्यात आले आहेत. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण मंगळवारी १४ ऑक्टोबर रोजी, जनावरांना चारा घालण्यासाठी गेलेल्या करण मोहन पाटील (वय ३३) या तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. आठवडाभरात अशा दोन घटनांमुळे बेळगुंदी ग्रामस्थांमध्ये चिंता पसरली आहे. काही दिवसांपूर्वी बेळगाव न्यायालय आवारात उभ्या असलेल्या एका कारमध्ये साप आढळला होता. यावरून परिसरात सापांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट होत आहे. पावसाळ्यानंतर वाढलेले तापमान आणि ओलसर जागा व थंड ठिकाण शोधत साप बाहेर पडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.