राष्ट्रीय

हैदराबादमधील ब्लिंकिट गोदामावर छापा; मुदत संपलेले खाद्यपदार्थ जप्त

दिनेश चोरगे

पुढारी ऑनलाईन डेस्क :  हैदराबादमधील झोमॅटोची क्विक कॉमर्स शाखा असलेल्या ब्लिंकिटच्या गोदामावर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.७) छापा टाकला. यावेळी रवा, कच्चे पीनट बटर, मैदा, पोहे, बेसन आणि बाजरी अशी ३० हजार रुपये किंमतीची एक्सपायरी डेट संपलेले खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले.

तेलंगणा फूड सेफ्टी कमिशनरने 'एक्स' वर पोस्ट करत या छाप्याबद्दल माहिती दिली. फूड सेफ्टी विभागाने सांगितले की, या छाप्यादरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत. येथील कंपनीने मूलभूत स्वच्छतेकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. तसेच एक्सपायरी डेट संपलेले खाद्यपदार्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे.

याबद्दल अन्न सुरक्षा आयुक्त म्हणाले, मेडचल मलकाजगिरी जिल्ह्यातील या गोदामानजीकचा परिसर धुळीने माखलेला आणि अस्वच्छ आढळून आला. तेथील खाद्यपदार्थ हाताळणारे हेडगियर, हातमोजे आणि ऍप्रनशिवाय दिसून आले. तसेच खाद्यपदार्थ हाताळणाऱ्यांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती. या खाद्यपदार्थांच्या शेजारी सौंदर्य प्रसाधने ठेवण्यात आली होती. लेबलवर नमूद केलेल्या पत्त्यासंदर्भात होल फार्म काँग्रेस ट्रेड अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा परवाना FSSI कायद्यानुसार नव्हता. कामाक्षी फूड्सने उत्पादित केलेल्या उत्पादनांची मुदत संपल्याचे आढळून आले, त्यामुळे व्हीएसआरची उत्पादने म्हणजे रवा, कच्चे पीनट बटर, मैदा, पोहे, बेसन आणि बाजरी, अशी ३० हजाराची उत्पादने जप्त करण्यात आली असल्याचे अन्न सुरक्षा आयुक्तांनी सांगितले. तसेच संशयास्पदरीत्या खराब झालेले नाचणीचे पीठ आणि तूरडाळ असा ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT