नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड जानेवारी २०२६ पर्यंत होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर, अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेसाठीच्या हालचालींना वेग आला असल्याचे समजते.
महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये भाजपच्या संघटनात्मक निवडी झाल्या आहेत. तर उत्तर प्रदेश आणि कर्नाटक भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची निवड अद्याप झालेली नाही. या दोन्ही राज्यांतील संघटनात्मक निवडी राष्ट्रीय अध्यक्षांच्या अगोदर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी नवे वर्ष उजडणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्षासाठी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव आणि शिवराज सिंह चौहान यांच्या नावांची चर्चा सध्या अध्यक्षपदासाठी सुरु आहे. यापैकी, आरएसएस आणि अमित शाह यांच्या जवळचे मानले जाणारे केशव प्रसाद मौर्य आणि बिहार निवडणूक प्रभारी म्हणून काम केलेले केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव आघाडीवर आहे.
केशव प्रसाद मौर्य यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी आहे. उत्तर प्रदेश आणि इतर निवडणूक रणनीतींना आकार देण्याचा त्यांना सखोल अनुभव आहे. तसेच बिहारमधील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने विधिमंडळ पक्षनेते निवड करण्यासाठी त्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्याचप्रमाणे, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःला एक अत्यंत प्रभावी भाजप नेते म्हणून स्थापित केले आहे. त्यांनी अलिकडच्या काळात पक्षाच्या अनेक निवडणूक विजयांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यामध्ये बिहारचाही समावेश आहे.