

मृणालिनी नानिवडेकर
मुंबई : बदलत्या भारतातील सरासरी वयाचा विचार करता नव्या पिढीशी नाते सांगणार्या राष्ट्रीय कार्यकारिणीची रचना केली जात असून भाजपचा नवा अध्यक्ष तरुण म्हणजेच 50 ते 60 या वयोगटातील असणार आहे.
सध्या जगत प्रकाश नड्डा हे त्यांचा कार्यकाळ संपला तरी केंद्रीय आरोग्य खात्याबरोबरच अध्यक्षपदाची सूत्रेही सांभाळत आहेत. नवा अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया बराच कालावधी उलटला असला तरी अद्याप सुरू झालेली नाही. भाजपचा नवा अध्यक्ष का निवडला जात नाही, या पदावर नेमायच्या व्यक्तीबद्दल पक्ष आणि रा. स्व. संघ यांचे संबंध ताणले गेल्याची चर्चा सुरू असतानाच आता पिढीसंबंधीच्या निर्णयामुळे या प्रक्रियेला वेळ लागत असल्याचे सत्य समोर आले आहे. भाजपने यासंदर्भात संघाशी चर्चा केली असून संघाला विश्वासात घेतले गेले आहे.
संघाने लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीयत्वाचे अन् पर्यायाने हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी दक्ष असलेला पक्ष या निकषावर आम्हाला मदत केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने 2029 पर्यंत देशाचे नेतृत्व करण्यासाठी निवडले आहे हे संघाला मान्य असल्याचेही या नेत्याने सांगितले. भारतीय जनता पक्षाने अध्यक्षपद आणि कार्यकारिणी रचनेबाबत नव्याने आखणी सुरू केली आहे. हे धोरण संघाला पूर्णत: मान्य आहे. देशातील काही राज्यांत भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अजून नेतानिवड झालेली नाही. कारण तेथेही नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणार्या चेहर्यांचा शोध सुरू आहे. पंतप्रधानपदाबाबत तसेच महत्त्वाच्या शासकीय जबाबदार्या सांभाळणार्या अन्य नेत्यांच्या भूमिकेबद्दल कोणताही फेरविचार होणार नसल्याचेही समजते.
नागपुरात नुकत्याच झालेल्या संघाच्या बैठकीत भाजपमधील संभाव्य बदलांबाबत काही ठोस आणि कटू निर्णय घेण्यात आले. काही बड्या केंद्रीय नेत्यांबद्दल संघाने या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. त्याबाबत विचारलेे असता संघाच्या महत्त्वाच्या पदाधिकार्यांची संघ शताब्दीतील कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यासाठी चर्चा झाल्याचे समजले. हिंदू समाजात भेदभाव निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक जातीतील, जनजातीतील सक्रिय व्यक्तींचे मेळावे तालुकास्तरावर होणार आहेत असे या बैठकीत ठरले. सामाजिक ऐक्य निकोप रहावे यासाठी असे मेळावे आयोजित केले जातात. आता ते जिल्हापातळीवर न राहता तालुका पातळीवर होणार आहेत.
संपूर्ण देशात भाजपने तरुणांना समोर आणण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील नागरिकांचे सरासरी वय लक्षात घेता आता 50 ते 60 या वयोगटातील अध्यक्ष असण्यावर भर दिला गेला आहे. या वयोगटात बसणार्या आणि जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. या निर्णयाला संघाचा पूर्णत: पाठिंबा आहे. एवढेच नव्हे तर आम्ही घेतलेला पिढीसंदर्भातील निर्णय संघाला पसंत असल्याचेही एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. संघाशी आम्ही विविध विषयांवर चर्चा करत असतो. मात्र त्यांचा आमच्या पक्षाच्या अंतर्गत कारभारात कोणताही हस्तक्षेप नसतो, असेही या नेत्याने नमूद केले.