

नवी दिल्ली: भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड लवकरच होणार आहे. याबरोबरच केंद्रीय मंत्रिमंडळात देखील फेरबदल होण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र बिहार निवडणुकीनंतरच नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणार असल्याचे पक्षाने ठरवले. त्याप्रमाणे आता बिहारच्या निवडणुका झाल्या असून भाजपला ऐतिहासिक विजय देखील मिळाला. यामुळे आता भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी निवड केली जाणार असल्याचे समजते.
भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव याच महिन्यात निश्चित केले जाऊ शकते. संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर रोजी सुरू होईल. दरम्यानच्या काळात भाजप नव्या अध्यक्षाची निवड केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. पुढच्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी मे पर्यंत निवडणुका सुरू राहिल्याने पक्षाला वेळ मिळणार नाही. त्यामुळे, या महिन्यातच राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत धर्मेंद्र प्रधान पुढे
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. बिहार निवडणुकीमध्ये ते पक्षाचे प्रभारी होते. त्यांच्या प्रभारी पदाच्या कार्यकाळात बिहारमध्ये पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीत पुढे मानले जात आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करतील अशी शक्यता आहे. सूत्रांनुसार, सध्या सरकारमध्ये असलेल्या अनेक नेत्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात आणि संघटनेत असलेल्यांना मंत्रिमंडळामध्ये आणले जाऊ शकते. मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांचा समावेश केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.