तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन यांनी अभिनेते विजय आणि अभिनेत्री त्रिशा यांच्‍याबाबत केलेल्‍या आपेक्षार्ह विधानाने तामिळनाडूतील राजकीय वातावरण तापले आहे.  File Photo
राष्ट्रीय

Vijay controversy |'विजयने आधी अभिनेत्री त्रिशाच्या घरातून बाहेर पडावं'; भाजप नेत्याच्या विधानाने तामिळनाडूतील राजकारण तापले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष नागेंद्रन यांनी उडवली अभिनेते विजय यांची खिल्ली, पक्षानेही घेतला बचावात्मक पवित्रा

पुढारी वृत्तसेवा

Tamil Nadu BJP state president controversial remarks

चेन्नई : तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन यांनी अभिनेते आणि 'टीव्हीके' (TVK) पक्षाचे प्रमुख विजय यांच्यावर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. "विजयनं राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर आधी अभिनेत्री त्रिशाच्या घरातून बाहेर पडावं," असे वादग्रस्त विधान नागेंद्रन यांनी केले आहे. या विधानानंतर तामिळनाडूचं राजकारण तापले असून, सर्वच स्तरांतून त्यांच्यावर टीका होत आहे.

"घराच्या छतावर चढता येत नाही, तो स्वर्गाची स्वप्नं पाहतोय"

आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी डीएमकेला (DMK) आपला 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्ष एकमेव आव्हान देईल, असा दावा विजय यांनी केला होता. या दाव्याची खिल्ली उडवताना नागेंद्रन म्हणाले की, "बिचारा विजय, तो पूर्णपणे अननुभवी आहे. ज्याला साध्या घराच्या छतावर चढता येत नाही, तो स्वर्गाची स्वप्ने पाहत आहे. त्याने आधी स्वतःच्या घरातून बाहेर पडलं पाहिजे. आधी त्रिशाच्या घरातून बाहेर पडा, मगच काहीतरी होईल."

विजयला दिला कुटुंबाशी संबंध सुधारण्याचा सल्ला

एवढेच नव्हे तर, नागेंद्रन यांनी विजयला आपल्या कुटुंबाशी संबंध सुधारण्याचा सल्लाही दिला. तसेच त्यांनी माध्यमांशी बोलताना आपले विधान मागे घेण्यास नकार दिला. "मी हे फक्त एकदाच बोललो आहे," असे म्हणत आपल्या भूमिकेचे समर्थन केले.

'मनुस्मृतीचे पालन करणार्‍यांकडून दुसरी काय अपेक्षा?'; डीएमके

या विधानानंतर सत्ताधारी डीएमकेने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. "भाजप नेते महिलांचा आदर न करण्यासाठीच ओळखले जातात," अशी टीका प्रवक्ते टी.के.एस. इलांगोवन यांनी केली. "हे लोक मनुस्मृतीचे पालन करतात, ज्यात महिलांना स्थान नाही. म्हणूनच तामिळनाडूची जनता भाजपच्या विरोधात आहे. नागेंद्रन हे 'आरएसएस'चे गुलाम झाले आहेत, म्हणूनच ते अशी भाषा बोलत आहेत."

काँग्रेसनेही केला निषेध

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सेलवापेरुन्थगाई यांनीही या विधानाचा निषेध केला. "राजकारणात अभिनेत्री त्रिशाचे नाव ओढण्याचे कारण काय? कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी करणे चुकीचे आहे," असे त्यांनी सुनावले.

भाजपचा बचावात्मक पवित्रा

दरम्यान, भाजप नेत्या विजयाधरणी यांनी नागेंद्रन यांचा बचाव केला आहे. "प्रदेशाध्यक्षांचे विधान चांगल्या अर्थाने होते, पण डीएमके राजकीय फायद्यासाठी त्याचा विपर्यास करत आहे. उलट डीएमकेच महिलांचा अपमान करण्यासाठी ओळखली जाते," असा दावा त्यांनी केला. तामिळनाडूमध्ये मे महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुका होणार आहेत. विजय यांनी आपल्या सभेत भाजप आणि डीएमके या दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली होती, त्यानंतर आता भाजपकडून हे वादग्रस्त प्रत्युत्तर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT