

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूमध्ये थुथुकुडी जिल्ह्यातील तिरुचेंदूर येथील सुब्रमण्य स्वामी मंदिरात हत्तीने तुडवल्याने दोघांचा मृत्यू झाला. बळी पडलेल्यांपैकी एक हत्तीचा माहूत होता आणि दुसरा त्याचा नातेवाईक होता. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
सुब्रमण्य स्वामी मंदिरात धार्मिक विधीसाठी देवनाई नावाचा हत्ती आहे. तिरुचेंदूर मुरुगन मंदिराचा अविभाज्य भाग असलेल्या देवानईची मंदिरात वर्षानुवर्षे देखभाल केली जात होती. सणासुदीच्या वेळी त्याला दागिन्यांनी सजवले जात होते. भगवान मुरुगनच्या सहा निवासस्थानांपैकी एक असलेले हे मंदिर देशभरातील भक्तांना आकर्षित करते. रविवारी दुपारी ही घटना घडली तेव्हा हत्ती त्याच्या शेडमध्ये होता. माहूत उदय कुमार आणि त्याचा नातेवाईक शिसुबालन हत्तीला फळे खाऊ घालत होते, तेव्हा हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला.
थुथुकुडी जिल्हा वन अधिकारी रेवती रमण यांनी सांगितले की, " मंदिरात २६ वर्षांची मादी हत्ती देवनाई आहे. सर्वसाधारणपणे हा एक अतिशय सभ्य प्राणी आहे. अशा प्रकारची आक्रमक वर्तणूक कधीही झाली नव्हती. त्यामुळे पशुवैद्यकीय तज्ज्ञांची आमची टीम तपासणी करत आहे. प्रत्यक्षात काय घडले आणि या प्रकाराला कारणीभूत काय ठरले याचा तपास करू. आमची टीम हत्तीची आरोग्य स्थिती, वागणूक आणि इतर सर्व पॅरामीटर्स पाहणार आहे.