प्रातिनिधिक छायाचित्र. AI-generated image
राष्ट्रीय

Bihar railway track spy camera |बिहारमधील रेल्वे स्‍टेशनवर सापडला 'गुप्त' कॅमेरा; सिम कार्डचे पाकिस्तान 'कनेक्शन'!

'व्‍हीआयपीं'च्‍या रेकीचा संशय, एटीएससह एसटीएफकडून सखोल तपास सुरु

पुढारी वृत्तसेवा

Bihar railway track spy camera

वैशाली : बिहारच्या वैशाली जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देणारे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. मुझफ्फरपूर-हाजीपूर रेल्वे मार्गावरील सराय स्टेशनवर रेल्वे सिग्नल टॉवरवर एक अवैध सोलर-पॉवर IP कॅमेरा बसवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्राथमिक तपासात या कॅमेऱ्याचा थेट संबंध कर्नाटकच्या मार्गे पाकिस्तानी दहशतवादी नेटवर्कशी असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. एटीएस (ATS) आणि एसटीएफने (STF) या प्रकरणी सखोल तपास करत आहे.

कॅमेऱ्याचे नियंत्रण कर्नाटकच्या किनारपट्टी भागातून

सराय स्टेशनजवळील फाटक क्रमांक ४३-सी च्या सिग्नल टॉवरवर एक आधुनिक इंटरनेट प्रोटोकॉल (IP) कॅमेरा बसवण्यात आला होता. रेल्वेच्या गेटमनच्या सतर्कतेमुळे हा कॅमेरा पकडला गेला असून त्याच्या तपासात धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. तांत्रिक तपासात असे आढळले की, या कॅमेऱ्याचे नियंत्रण कर्नाटकच्या किनारपट्टी भागातून केले जात होते. त्याचे कनेक्शन पाकिस्तानी दहशतवादी नेटवर्कशी आहे. या कॅमेऱ्याद्वारे एखाद्या मोठ्या हल्ल्याची किंवा व्हीआयपी हालचालींची रेकी केली जात असावी, असा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे.

सोलर पॉवर आणि 4G सिमने सज्ज कॅमेरा

जप्त केलेला कॅमेरा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आहे. याला बाह्य वीज जोडणीची गरज नव्हती, कारण तो सोलर पॅनेलवर (सौर उर्जेवर) चालत होता. यामध्‍ये यात 4G सिम कार्ड होते. धक्कादायक बाब म्‍हणजे कर्नाटकात बसलेली व्यक्ती मोबाईलवरून कॅमेरा ऑपरेट करत होती. हा कॅमेरा रात्रीच्या अंधारातही स्पष्ट रेकॉर्डिंग करण्यास सक्षम आहे. पोलिसांनी आतापर्यंत यातून एक तासाचे फुटेज मिळवले आहे.

दहशतवादी यासीन भटकळच्या टोळीशी कनेक्‍शन?

हरियाणा भाषेत बोलणारा व्‍यक्‍तीने एका दिवसापूर्वी (NGO) कर्मचारी सांगून हा कॅमेरा फिट केला होता. कॅमेऱ्याच्या डेटाचा संबंध दहशतवादी यासीन भटकळच्या टोळीशी असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सिम कार्डचे कनेक्शन पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्या लोकांच्या नावावर असल्‍याचेही तपासात समोर आले आहे. हा एक फिरता कॅमेरा असून कोणत्याही दिशेला फिरवला जाऊ शकत होता.

ATS आणि STF ची संयुक्‍त तपास सुरु

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्टेशन मास्टर मनोज कुमार यांच्या जबाबावरून एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. बिहार मुख्यालयाच्या सूचनेनुसार, एटीएसचे तीन सदस्यीय पथक आणि एसटीएफने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. पूर्व मध्य रेल्वेचे आरपीएफ आयजी आणि रेल्वे एसपी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने आयपी ॲड्रेस आणि डेटा रूटचा शोध घेतला जात आहे.

सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट

रेल्वे ट्रॅकसारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारची हेरगिरी झाल्याने सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा एखाद्या मोठ्या रेल्वे अपघाताचा किंवा हल्ल्याचा कट असू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून कॅमेरा लावणाऱ्या संशयिताचा शोध घेत आहेत. संपूर्ण रेल्वे मार्गावर सुरक्षा वाढवण्यात आली असून तपास मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

इंटरनेट प्रोटोकॉल (IP) कॅमेरा कसा काम करतो ?

इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरा हा एक डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आहे. हा कॅमेरा डेटा प्राप्त करण्यासाठी आणि पाठवण्यासाठी संगणक नेटवर्कचा वापर करतो. पारंपारिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांप्रमाणे या इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेर्‍याला स्थानिक रेकॉर्डिंग डिव्हाइस (DVR) ची गरज नसते. तो थेट इंटरनेटशी जोडलेला असतो. वापरकर्ता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आपल्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर थेट फुटेज पाहू शकतो. डिजिटल सिग्नलमुळे व्हिडिओची गुणवत्ता अत्यंत उच्च असते.डेटा क्लाउड स्टोरेजमध्ये किंवा कॅमेऱ्यातील एसडी कार्डमध्ये सुरक्षित ठेवता येतो. इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेर्‍याचा वापर प्रामुख्याने उच्च सुरक्षा, देखरेख आणि गुप्तचर मोहिमांसाठी केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT