Rose Day Controversy: संपूर्ण जगभरात सध्या व्हॅलेंटाईन डे वीक उत्साहात साजरा केला जात आहे. नुकतेच रोज डे झाला. त्या दिवशी जगभरात गुलाबाचे मोठ्या प्रमाणावर आदान प्रदान करण्यात आलं. आपल्या प्रीय व्यक्तीला गुलाब देण्यात बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील एक महिला देखील मागे नव्हती. तिनं आपल्या पतीला गुलाब दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील शेअर केला. मात्र त्यानंतर हे जोडपं कायदेशीर कचाट्यात अडकलं आहे. पोलिसांनी थेट FIR च दाखल केली.
मुंगेरमधील कांचन देवी या महिलेनं आपल्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. यात त्या आपल्या प्रिय पतीला गुलाब देताना दिसतात. मात्र त्यांनी गुलाब देऊन झाल्यावर आपल्या लाडक्या पतीसाठी ग्लासमध्ये वाईन ओतली. त्यांनी पतीला दारूची बॉटल देखील दिली अन् इथं हे जोडपं फसलं. या व्हिडिओ पती दारूची बॉटल मिळाल्यानंतर हसत होता. मात्र आता तो कायदेशीर कचाट्यात अडकल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचं हे हास्य नक्कीत नाहीसं झालं असणार.
मुंगेर जिल्हा हा बिहारमध्ये येतो आणि बिहारमध्ये दारू बंदी आहे. त्याबाबत राज्यात कडक कायदे करण्यात आले आहेत. बर या गुलाब देणाऱ्या कांचन देवी या अजून एका मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. त्यांचा अजून एक वेगला फोटा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत त्या ब्युटी पार्लरमध्ये हातात पिस्तूल घेऊन उभ्या असल्याचं दिसत आहे.
दरम्यान आता मुंगेरचे एसबी सईद इम्रान मसूद यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केलं असल्याचं सांगितलं. पोलिसांनी या कांचन देवींच्या घरावर छापा देखील मारला आहे.
चौकशीदरम्यान, फोटोतील कांचन देवी यांच्याकडे असलेल्या पिस्तूलाचा परवाना आहे. मात्र हा परवाना विशाल कुमार यांच्या नावावर आहे. ते दीन दयाल चौक इथं राहतात. जरी हे पिस्तूल परवाना असलेलं असलं तरी ते एका दुसऱ्याच व्यक्तीच्या हातात दिलं आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यानं कायद्याचं उल्लंघन झालं आहे.
पोलिसांनी याबाबत कांचन देवी आणि पिस्तूलाचे मालक विशाल कुमार या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. एसपी मसूद यांनी सांगितले की शस्त्राचे आणि बंदी असलेल्या नशेच्या पदार्थांचे असे जाहीर प्रदर्शन करणं हा गंभीर गुन्हा आहे. पोलीस दल सध्या याचा तपास करत आहे आणि कायदेशीर कारवाईची तयारी करत आहे.