Bengaluru Child Abuse Case: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. 11 आणि 12 वर्षांच्या दोन अल्पवयीन अनाथ बहिणींवर गेल्या एका वर्षापासून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या अत्याचारांचे व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर अपलोड केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून मुलींचा काका अद्याप फरार आहे.
राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टल (NCRP) कडून मिळालेल्या अलर्टनंतर सायबर कमांड सेंटरच्या (CCC) अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक केली. बाल लैंगिक अत्याचारांचे व्हिडिओ तयार करून ऑनलाइन अपलोड करणाऱ्यांवर कारवाई झाल्याची अलीकडच्या काळातील ही महत्त्वाची घटना मानली जात आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये 29 वर्षीय किरण कुमार नायक आणि 20 वर्षीय आदित्य एम. के. यांचा समावेश आहे. किरण हा कग्गलीपुराजवळील कैदल्लीपल्या परिसरात जनावरे चारण्याचे काम करत होता, तर आदित्य चन्नपटणा येथे स्विमिंग पूल देखभाल कर्मचारी म्हणून कार्यरत होता. पोलिसांनी आरोपींकडून तीन मोबाईल फोन जप्त केले असून त्यामध्ये अत्याचारांचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आल्याचे पुरावे आढळून आले आहेत.
पीडित मुली या बंगळुरू दक्षिण जिल्ह्यातील रामनगर भागातील शेतकरी कुटुंबातील आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते, तर दारूच्या व्यसनामुळे वडिलांचाही दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन्ही बहिणी आपल्या काकासोबत राहत होत्या. मात्र, काकांनी मुलींच संरक्षण करायचं सोडून त्यांचा विश्वासघात केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींचा काका हा आरोपींपैकी एकाच्या परिचयाचा होता. आरोपींकडून पैसे घेऊन त्याने मुलींना त्यांच्यासोबत पाठवण्यास परवानगी दिल्याचा आरोप आहे. यानंतर गेल्या एका वर्षापासून या अल्पवयीन मुलींचे सातत्याने लैंगिक शोषण करण्यात येत होते.
सायबर कमांड सेंटरचे महासंचालक प्रोनब मोहंती यांनी सांगितले की, या प्रकरणी कग्गलीपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. फरार काकाचा शोध सुरु आहे.