Bengaluru ATM Cash Crisis
बंगळूर : येथील एटीएममधून रोख रक्कम (कॅश) जवळजवळ गायब झाल्याचे चित्र आहे. रोकड मिळविण्यासाठी नागरिक एका एटीएममधून दुसऱ्या एटीएममध्ये फेऱ्या मारत आहेत. एटीएममध्ये ५०० रुपयांची नोट मिळणेही आता दुर्मिळ झाले आहे.बँकांमध्ये रोख रकमेची मागणी अचानक वाढली असून त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. याच कारणामुळे एटीएममध्येही नवीन नोटांच भरणा होत नसल्याचे वृत्त 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिले आहे.
सध्या सरकारी आणि खासगी बँकांना रोख रकमेच्या (कॅश) कमतरतेचा सामना करावा लागत आहे. बँकांकडे पैसे येत नाहीत असे नाही, पण अचानक कॅशची मागणी प्रचंड वाढल्याने बँकांना एटीएममध्ये पुरेसे पैसे भरता येत नाहीत. परिणामी, एटीएममध्ये खूपच कमी रक्कमेचा भरणा केला जात आहे. बँक अधिकाऱ्यांच्या मते, सध्या 'करंट' आणि 'ओव्हरड्राफ्ट' खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर पैसे काढले जात आहेत. विशेषतः बांधकाम क्षेत्र, रिअल इस्टेट आणि सरकारी नागरी प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदारांना मजुरांचे पगार रोख स्वरूपात द्यावे लागतात. त्यामुळे हे लोक मोठ्या प्रमाणात कॅश काढत आहेत.सामान्यतः बँकांतून काढलेला पैसा काही दिवसांत पुन्हा बँकिंग सिस्टममध्ये जमा होतो, पण गेल्या काही आठवड्यांपासून हा पैसा परत येण्याचे प्रमाण मंदावले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बँका आणि एटीएममध्ये पैसे मिळणे कठीण झाले आहे. यामागची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे...
१. पैसे येण्यापेक्षा जाण्याचे प्रमाण जास्त
बँकांमधून सध्या पैसे काढण्याचे प्रमाण वाढले आहे, पण त्या तुलनेत बँकांकडे पैसे परत जमा होत नाहीयेत. विशेषतः बांधकाम क्षेत्र आणि सरकारी कंत्राटदार मजुरांचे पगार देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम काढत आहेत. साधारणपणे हा पैसा काही दिवसात पुन्हा बँकेत येतो, पण सध्या हे चक्र मंदावले आहे.
२. विविध निवडणुकीचा परिणाम
तज्ज्ञांच्या मते, आगामी निवडणुका हे या तुटवड्याचे मुख्य कारण असू शकते.बेंगळुरू महानगरपालिका निवडणूक: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३० जूनपूर्वी या निवडणुका होणे अपेक्षित आहे.: केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत.निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यावर रोख रकमेची ने-आण करणे कठीण होते, त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवार आधीच निधी गोळा करून ठेवत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दैनंदिन व्यवहारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ५०० रुपयांच्या नोटांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. बँका सध्या शाखेपेक्षा एटीएममध्ये पैसे भरण्याला प्राधान्य देत आहेत, तरीही रोकड मर्यादितच आहे.बँकांनी या समस्येबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) मदत मागितली आहे.तसेच कॅशचा वापर कमी करून जास्तीत जास्त डिजिटल पेमेंट (UPI, नेट बँकिंग) चा वापर करावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.