Bahraich Crocodile Attack Video Viral Pudhari
राष्ट्रीय

Crocodile Attack Video: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षीय मुलाला मगरीने पाण्यात ओढले; पाच तासांनी सापडला मृतदेह

Bahraich Crocodile Attack: उत्तर प्रदेशातील बहराइच येथे घाघरा नदीकाठी हात-पाय धुत असताना 12 वर्षीय मुलावर मगरीने हल्ला करून त्याला पाण्यात ओढून नेले.

पुढारी वृत्तसेवा

Bahraich Crocodile Attack: उत्तर प्रदेशातील बह्राइच जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. घाघरा (सरयू) नदीच्या काठावर हात-पाय धुण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलावर मगरीने अचानक हल्ला केला. मुलाला जबड्यात पकडून नदीच्या खोल पाण्यात ओढून नेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना गुरुवारी सायंकाळी बौंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरौवा गावाजवळ घडली. प्राथमिक माहितीनुसार, सुनील सिंह हा आपल्या काकांसोबत शेतात पिकाची लागवड करण्यासाठी गेला होता. काम आटोपल्यानंतर दोघेही नदीकाठी हात-पाय धुत होते. त्याच वेळी नदीतून अचानक एक मगर बाहेर आली आणि सुनीलवर झडप घातली.

मगरीने सुनीलला जबड्यात पकडत खोल पाण्यात ओढून नेले. मुलाने स्वतःला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याचे काका आणि आसपासचे ग्रामस्थ धावत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दगड फेकून आणि आरडाओरड करून मगरीला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र मगरीने मुलाला सोडले नाही.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, मगरीने मुलाला अनेकदा पाण्यात आपटत खोल पाण्यात नेले. त्यानंतर तो नजरेआड झाला. घटनेनंतर ग्रामस्थांनी बांबू आणि टॉर्चच्या साहाय्याने नदीत शोधमोहीम सुरू केली.

सुमारे पाच तासांच्या शोधानंतर रात्री उशिरा घटनास्थळापासून काहीशे मीटर अंतरावर मुलाचा अर्धवट मृतदेह नदीत तरंगताना आढळला. मगरीच्या हल्ल्यात त्याच्या शरीराचा खालचा भाग गंभीररीत्या विद्रूप झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची पुष्टी केली असून, मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. प्रशासनाने मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

मृत सुनील सिंह हा चार भावंडांपैकी एक होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर तो आपल्या काकांसोबत राहत होता. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.

दरम्यान, घाघरा (सरयू) नदीतील पाण्याची पातळी वाढल्यानंतर मगरींच्या हालचाली वाढल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. यापूर्वीही या परिसरात अशा घटना घडल्या असून, नदीकाठच्या गावांमध्ये सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT