Anti-Naxal Operation x
राष्ट्रीय

Anti-Naxal Operation: 10 हजार जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले; केंद्रीय सुरक्षा दलांची 'निर्णायक' मोहिम

Anti-Naxal Operation: शरण या किंवा मरा : सुरक्षा दलांचा इशारा; सीआरपीएफ, कोब्रा, डीआरजी जवानांचा मोहिमेत समावेश

Akshay Nirmale

‍Big Anti-Naxal Operation of central security forces

भोपाल: केंद्रीय सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी आघाडी उघडली आहे. हेलिकॉप्टर्स, ड्रोन, वैद्यकीय कर्मचारी आणि अत्याधुनिक युद्धतंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही मोहीम राबवली जात आहे.

नक्षलवादाच्या मुळावर घाव घालणे, विशेषतः या भागात कॅम्प असलेल्या कुप्रसिद्ध पीएलजीए बटालियन क्रमांक 1 च्या नेतृत्वाचा नायनाट करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

सुमारे 10 हजारांहून अधिक जवानांनी सुमारे 500 हून अधिक नक्षलवाद्यांना घेरले असून आत्तापर्यंतची अशी ही सर्वात मोठी मोहिम असल्याचे सांगितले जात आहे.

CRPF, CoBRA, DRG या सुरक्षा दलातील जवानांसह छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश येथील पोलिसांचाही या कारवाईत समावेश आहे.

निर्णायक मोहिम

छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमा जिथे एकत्र येतात त्या डोंगररांगेत जंगलामध्ये देशातील आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी नक्षलविरोधी मोहिम सुरू करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, पहिल्यांदाच सुरक्षा दलांनी आपल्या अधिकृत प्रेस नोटमध्ये या मोहिमेला "निर्णायक मोहीम" असे संबोधले आहे.

जे 500 नक्षलवाद्यांना घेरले गेले आहे त्यात नक्षलवादी चळवळीतील वरिष्ठ लीडर आणि कुख्यात कमांडर हिडमा हे देखील असल्याचे मानले जाते.

CRPF चे महासंचालक करताहेत या मोहिमेचे नेतृत्व

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीला सीआरपीएफचे महासंचालक जी. पी. सिंग यांनी गैरहजर होते. ते छत्तीसगडमध्ये राहून वैयक्तिकरित्या या मोहिमेचे समन्वयन करण्यास प्राधान्य दिले.

सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना थेट या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेचे नेतृत्व करण्यास सांगण्यात आले आहे. या मोहिमेचा चौथा दिवस सुरू असल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून यंत्रमागी तोफा (MMGs) वापरून हवेतूनही सुरक्षा पुरवली जात आहे.

नक्षलवाद्यांची रसद तोडली

गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार सुरक्षा दलांनी घेरल्याने माओवाद्यांची अन्न आणि पाण्याची रसद तुटली आहे. त्यामुळे त्यांना अन्न-पाण्याचा तुटवडा भासत आहे. वेंकटपुरम आणि पूरवटी येथून ही रसद पुरवली जात होती. आता हा पुरवठा खंडित झाला आहे.

या संपूर्ण परिसरावर हेलिकॉप्टर्स वरून घिरट्या घालत आहेत. तसेच ड्रोनद्वारेही टेहळणी केली जात आहे. जमिनीवर सैनिकांसाठी रायफल्स, दारूगोळा पुरवला गेला आहे. त्यासह जवान पुढे पुढे सरकत चालल्याची माहिती आहे.

शरण या किंवा मरा

कर्रेगट्टा, नादपल्ली आणि पुजारी कांकेरच्या दाट जंगलांमध्ये जवळपास 10,000 विशेष कमांडोनी ‘नक्षल बटालियन क्रमांक 1’ च्या मुख्य गडाला घेरले आहे. त्यामुळे माओवाद्यांसाठी ही परिस्थिती "शरण या किंवा मरा' अशी बनली आहे.

या भागात अऩेक ठिकाणी आयईडी स्फोटके जमिनीत पुरलेली असायची. सैनिकांसाठी विविध सापळे या भूमीमध्ये लावले जात होते. आता स्फोटकांचा भुलभुलैय्या असलेली ही जागा तिन्ही राज्यांच्या सैनिकांनी घेरली आहे.

हवाई दलाचेही सहकार्य

गेल्या 72 तासांपासून सुरक्षा दलाचे जवान येथे तळ ठोकून आहेत. त्यामध्ये स्नायपर्सचाही समावेश आहे.

महाराष्ट्राचे C-60 कमांडो, तेलंगणाचे ग्रेहाउंड्स आणि छत्तीसगडचे डीआरजी यांनी या नक्षलवाद्यांची प्रत्येक संभाव्य पळवाट बंद केली आहे. हिडमा, दामोदर, देवा आणि विकास यांच्यासह शेकडो माओवादी नेते अडकले असल्याची माहिती आहे.

भारतीय हवाई दलाच्या मदतीने या मोहिमेसाठी सैनिकांना थेट कार्यक्षेत्रात नेले जात आहे. मोहिमेच्या मुख्य नियंत्रण केंद्रामध्ये सतत हालचाल सुरू आहेत.

पाच नक्षलवाद्यांचा खात्मा

सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. ठार झालेले नक्षलवादी पीएलजीए बटालियन क्रमांक 1 चे सदस्य आहेत. तेथून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटके आणि माओवादी साहित्य जप्त केले आहे.

वरिष्ठ नेते, अधिकाऱ्यांचे मोहिमेवर लक्ष

CRPF महासंचालकांव्यतिरिक्त, अनेक वरिष्ठ अधिकारी दररोजच्या रणनैतिक ब्रीफिंगमध्ये आणि प्रत्यक्ष मैदानात समन्वय राखण्यासाठी सक्रीयपणे सहभागी आहेत.

छत्तीसगडचे गृह मंत्री विजय शर्मा, एडीजी विवेकानंद सिन्हा, सीआरपीएफचे आयजी राकेश अग्रवाल आणि बस्तरचे आयजी सुंदरराज पी. प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.

ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर पुढील मोठे आव्हान म्हणजे या प्रदेशावर नियंत्रण टिकवून ठेवणे. CRPF चे वरिष्ठ अधिकारी असे मानतात की, ही मोहीम जर यशस्वी झाली तर भारतातील नक्षलवादाचा जवळजवळ संपूर्णपणे अंत होऊ शकतो.

यानंतर लहान नक्षली गटांवर आणि त्यांच्या स्थानिक समर्थकांच्या नेटवर्ककडे मोर्चा वळवला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT