Annamalai Coimbatore posters
चेन्नई : भाजपचा तामिळनाडूतील 'चेहरा', अशी लोकप्रियता लाभलेले माजी प्रद्रेशाध्यक्ष अण्णामलाई यांच्या कोईम्बतूरमधील पोस्टर्समुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या फॅन्स असोसिएशनच्या समर्थकांनी नवीन सदस्य आणि पदाधिकार्यांची नोंदणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे, भाजपच्या दोन राज्यातील महत्त्वाच्या बैठकांना अण्णामलाई यांची गैरहजेरी आणि 'त्रिभाषा सूत्रा'वरून केंद्रासोबत झालेले मतभेदामुळेही त्यांच्या नवीन राजकीय वाटचालींबाबत चर्चेला वेग आला आहे.
कोईम्बतूरमध्ये अण्णामलाई यांचे फोटो असलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर "निर्भीड मनाला कोणतीही सीमा नसते" (Fearless minds gave no limits) असे वाक्य लिहिलेले असून, यामुळे तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई नवा राजकीय पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
कोईम्बतूरमध्ये भाजपची राज्य केंद्रीय समितीची बैठक सुरू असताना आणि अण्णामलाई सध्या परदेशात असतानाच या घडामोडी समोर आल्या आहेत. अण्णामलाई यांच्या समर्थकांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अण्णामलाई अनबू कुट्टम' (Annamalai Anbu Koottam) ही त्यांची फॅन्स असोसिएशन सध्या नवीन सदस्य आणि पदाधिकार्यांचे अर्ज स्वीकारत आहे.अण्णामलाई यांनी आतापर्यंत राज्य केंद्रीय समितीच्या दोन बैठकांना दांडी मारली आहे, ज्यामुळे त्यांच्या राजकीय भविष्याबद्दलच्या तर्क-वितर्कांना आणखी खतपाणी मिळाले आहे.
अण्णामलाई यांनी अद्याप या घडामोडींवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्या एक्स पोटस्टने चर्चेत तेल ओतण्याचे काम केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "तामिळनाडूत आणखी एक राजकीय पक्ष येण्याच्या मार्गावर आहे, राजकीय घुसळण वेगवान झाली आहे."
भाषा धोरणावरून अण्णामलाई आणि केंद्र सरकारमध्ये उघड मतभेद झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात अण्णामलाई यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला एक विनंती केली होती. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन भाषा अनिवार्य करणारी नवीन अधिसूचना मागे घ्यावी आणि २०२९-३० या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू करण्याच्या आधीच्या निर्णयावर ठाम राहावे, असे अण्णामलाई यांनी म्हटले होते.१५ मे २०२६ रोजी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सर्व संलग्न शाळांना एक अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार १ जुलै २०२६ पासून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे.
अण्णामलाई यांनी 'X' वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, या निर्णयामुळे अनेक पालकांना, विशेषतः तामिळनाडूतील पालकांना मोठा धक्का बसला आहे, कारण त्यांच्या मुलांनी इयत्ता सहावीमध्येच त्यांच्या आवडीची भाषा निवडली आहे. सुधारित अधिसूचनेनुसार आता इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना १ जुलै २०२६ पासून तीन भाषा शिकाव्या लागतील, ज्यापैकी दोन भाषा भारतीय असणे बंधनकारक आहे. "इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याकडून इतक्या कमी नोटीसवर नवीन भाषा शिकण्याची अपेक्षा ठेवल्यास मुलांवर मानसिक ताण येईल आणि त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होईल." अण्णामलाई यांनी स्पष्ट केले की, एप्रिल २०२६ मध्ये जेव्हा सीबीएसईने इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन भाषा अनिवार्य केल्या होत्या (ज्यात दोन भारतीय भाषा असणे आवश्यक होते), तेव्हा त्यांनी स्वतः या निर्णयाचे स्वागत केले होते. या निर्णयामुळे मुलांना भारताच्या विविध साहित्यिक क्षेत्राची ओळख होण्यास मदत होईल, असे त्यांचे मत होते. मात्र, त्याच एप्रिल २०२६ च्या अधिसूचनेत सीबीएसई शाळांमधील नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा केवळ २०२९-३० च्या शैक्षणिक वर्षापासून अनिवार्य केली जाईल, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
केंद्रासोबतचे भाषा धोरणावरील मतभेद हा एकमेव कळीचा मुद्दा नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी अण्णामलाई यांचे 'अभाद्रमुक' (AIADMK) या मित्रपक्षासोबतचे संबंध कमालीचे ताणले गेले होते. सूत्रांनुसार, मित्रपक्षाच्या आग्रहावरूनच त्यांना भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. सी. एन. अन्नादुराई आणि जे. जयललिता यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ही दरी आणखी वाढली होती.भाषा धोरणावरून केंद्रासोबत असलेले मतभेद, एआयएडीएमकेसोबतचे बिघडलेले संबंध आणि भाजपच्या महत्त्वाच्या बैठकांमधील त्यांची अनुपस्थिती, या सर्व घटकांमुळे अण्णामलाई यांच्या राजकीय भविष्याबद्दलच्या चर्चा सातत्याने सुरू आहेत.
कोईम्बतूरमधील हे पोस्टर्स आणि 'अण्णामलाई अनबू कुट्टम'च्या हालचाली म्हणजे एखाद्या नवीन राजकीय पक्षाची नांदी आहे, की केवळ त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केलेले प्रेम आहे, हे अजूनही अस्पष्ट आहे; कारण भाजपच्या या माजी प्रदेशाध्यक्षांनी अद्याप यावर जाहीरपणे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.