

चेन्नई; वृत्तसंस्था : ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (अण्णा द्रमुक) पक्षातील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर येऊ लागले असून, पक्षाच्या तीन आमदारांनी सोमवारी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सादर केले. मरगथम कुमारवेल, सत्यभामा आणि जयकुमार या आमदारांनी तामिळनाडू सचिवालयात विधानसभा अध्यक्ष जेसीडी प्रभाकरण यांची भेट घेऊन राजीनामे दिले.
राजीनाम्यानंतर या तिन्ही आमदारांनी तामिळनाडूचे मंत्री आणि टीव्हीके पक्षाचे नेते आधाव अर्जुन यांची भेट घेतल्याने त्यांच्या टीव्हीकेमध्ये प्रवेशाच्या चर्चांना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राजीनामे स्वीकारतात की नाही, याबाबत निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
मरगथम कुमारवेल, सत्यभामा आणि जयकुमार यांनी अनुक्रमे मदुरांतकम, धारापूरम आणि पेरुंदुराई मतदारसंघांतून विजय मिळवला होता. राजीनामे मंजूर झाल्यानंतर या तिन्ही ठिकाणी पोटनिवडणुका होतील. याशिवाय मुख्यमंत्री विजय यांनी दोन जागांवर विजय मिळवल्यानंतर त्रिची पूर्व मतदारसंघाचाही राजीनामा दिला असल्याने तेथेही पोटनिवडणूक होणार आहे. यापूर्वी 18 मे रोजी अण्णा द्रमुकचे एस. सेम्मालाई यांनीही पक्षातील घडामोडींवर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता. कार्यकर्त्यांमध्येही असंतोष असल्याचा दावा त्यांनी केला होता. दरम्यान, द्रमुकने टीव्हीकेवर आमदारांची फोडाफोड आणि ‘घोडेबाजार’ केल्याचा आरोप केला आहे.
अण्णा द्रमुकने विधानसभा निवडणुकीत 47 जागा जिंकल्या होत्या; मात्र या राजीनाम्यांमुळे पक्षातील आमदारांची संख्या आता 44 वर येणार आहे. निवडणुकीनंतर पक्षात गटबाजी तीव्र झाली आहे. मुख्यमंत्री विजय यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी पक्षातील 25 आमदारांनी टीव्हीकेच्या बाजूने मतदान केले होते. टीव्हीकेकडे 119 आमदारांचा पाठिंबा होता, तरी विश्वासदर्शक ठराव 144 मतांनी मंजूर झाला.