प्रख्यात उद्योजक आनंद महिंद्रा पुन्हा एकदा सोशल मीडियावर एका खास पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. Pudhari
राष्ट्रीय

Anand Mahindra X post | 'तुम्ही रस्त्यावर कचरा टाकत असाल तर ...' : सिक्कीम पर्यटनावर आनंद महिंद्रा नेमके काय म्हणाले?

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिक्कीममधील स्वच्छतेची शिस्त केली अधोरेखित

पुढारी वृत्तसेवा

Anand Mahindra X post

नवी दिल्ली : प्रख्यात उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) पुन्हा एकदा सोशल मीडियावर एका खास पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी सिक्कीमला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक सडेतोड संदेश दिला आहे. त्यांनी राज्याच्या कडक स्वच्छता संस्कृतीचे कौतुक करत ज्यांना रस्त्यावर कचरा टाकण्याची सवय आहे त्यांनी सिक्कीममध्ये जाऊच नये, असा इशाराच दिला आहे. महिंद्रा यांची एक्स पोस्ट अल्पावधीतच व्हायरल झाली असून, यावरून नागरिक म्हणून आपली सामाजिक जबाबदारी आणि सिक्कीम हे भारतातील सर्वात स्वच्छ राज्य का आहे, यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

व्हायरल व्हिडिओ केला शेअर

व्हायरल व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी सिक्कीम राज्य स्वच्छतेबाबत किती गंभीर आहे आणि स्थानिक लोक तसेच पर्यटकांनी नियमांचे पालन करणे कसे गरजेचे आहे, यावर प्रकाश टाकला आहे.

मोठा संदेश देणारा व्हिडिओ

एका व्हिडिओमध्ये सिक्कीममधील रस्त्यावर कारमधून जाणाऱ्या व्यक्तीने संत्र्याची साल फेकली. स्थानिकांनी त्याला तात्काळ अडवले. त्याला तो कचरा उचलण्यास सांगण्यात आले. ही एक लहानशी घटना होती, पण तिने एक मोठा संदेश दिला. सिक्कीममध्ये तुम्ही तिथले रहिवासी असाल किंवा पर्यटक, तुम्हाला तिथल्या सार्वजनिक ठिकाणांचा आणि नैसर्गिक सौंदर्याचा आदर करावाच लागतो.

सिक्कीमचे खरे सौंदर्य तिथल्या लोकांच्या मानसिकतेत

आनंद महिंद्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, "तुम्ही गाडीच्या खिडकीतून सहज कचरा बाहेर फेकून देणाऱ्यांपैकी असाल, तर सिक्कीमला जाण्याचा विचारही करू नका; पण जर हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येत असेल, तर बॅग भरणे आणि तिथे जाणे हा तुमच्या आयुष्यातील पर्यटनाचा सर्वोत्तम निर्णय ठरू शकतो. कारण मला असे वाटते की सिक्कीमचे खरे सौंदर्य केवळ तिथल्या निसर्गात नाही, तर तिथल्या लोकांच्या मानसिकतेत आहे."

नेटकऱ्यांकडून सिक्कीमवर कौतुकाचा वर्षाव

आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टने हजारो भारतीयांच्या मनाला भुरळ घातली. अनेकांनी सिक्कीमचे कौतुक करत इतर राज्यांनीही यातून धडा घेतला पाहिजे असे म्हटले आहे. एका युझरने आपल्या रोड ट्रिपचा अनुभव शेअर करत लिहिले, "सिक्कीममधील 'नो हॉंकिंग' (हॉर्न न वाजवणे) ची पद्धत अनुभवणे खरोखरच अप्रतिम आहे. आम्ही बागडोगराहून सिक्कीमला जात होतो. आम्ही राज्यात प्रवेश करताच आमचा ड्रायव्हर शांत झाला आणि त्याने हॉर्न न वाजवण्यासह सर्व नियमांचे पालन केले. तिथल्या स्पष्ट नियमांमुळे त्याच्या वर्तनात हा बदल झाला."

सिक्कीम प्रिय देशाचा भाग असल्याचा आपल्याला अभिमान

एका युझरने कमेंट केली, "हे खरोखरच अप्रतिम आहे. इतर राज्यांनीही अशीच स्वयंशिस्त राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या प्रिय देशाचा भाग असल्याचा आपल्याला अभिमान आहेच, पण त्याचसोबत आपल्या देशाला अधिक शिस्तबद्ध बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया." एकाने लिहिले, "सिक्कीमचे खरे सौंदर्य केवळ तिथले पर्वत, दऱ्या आणि धबधब्यांमध्ये नाही, तर तिथल्या लोकांच्या नागरिकशास्त्राच्या जाणिवेमध्ये आणि निसर्गाप्रती असलेल्या आदरामध्ये आहे." तर आणखी एकाने अचूक मुद्दा मांडत लिहिले, "स्वच्छ ठिकाणे केवळ स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळे तयार होत नाहीत. ती अशा नागरिकांमुळे तयार होतात जे सार्वजनिक ठिकाणांना 'आपली जबाबदारी' समजतात."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT