Raghav Chadha News | राघव चढ्ढा Gen Z च्या नजरेत 'व्हिलन' का बनले?

Raghav Chadha News | 'अनफॉलो' बटण दाबून केला जातोय 'आप' सोडल्याचा निषेध
Raghav Chadha News
भाजप नेते राघव चढ्ढा.Pudhari
Published on
Updated on

Raghav Chadha News

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचा जन्मच मुळी भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून झाला. देशातील लाखो तरुणांसाठी हा पक्ष एका नवक्रांतीचे स्वप्न दाखवणारा ठरला. पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यानंतर 'झेन-झी' (Gen Z) म्हणजेच तरुण पिढीची सर्वाधिक पसंती खासदार राघव चढ्ढा यांना होती. आता त्यांनीच 'आप'ची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासाठी हा केवळ एक राजकीय बदल असला तरी, त्यांच्या तरुण चाहत्यांसाठी मात्र ही एक 'प्रतारणा' ठरली आहे. पक्षांतरानंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्सच्या संख्येत लाखांनी घट झाली आहे. त्यांच्या 'आम' राजकारणापासून सुरू झालेला 'सेलिब्रिटी' राजकारण्यापर्यंतचा प्रवास याला कारणीभूत मानला जात आहे. यामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्याशी झालेला त्यांचा विवाह हा केंद्रबिंदू ठरला. सोशल मीडियावरील एकेकाळचे सर्वात लोकप्रिय नेते असणाऱ्या राघव चढ्ढा यांना तरुणाईने का झिडकारले? जाणून घेऊया यामागची सविस्तर कारणे...

अल्पावधीत राघव चढ्ढा बनले तरुणाईमधील लोकप्रिय चेहरा

'आप'मधील सर्वात अभ्यासू, शांत आणि आधुनिक चेहरा अशी राघव चढ्ढा यांची तरुणाईत प्रतिमा होती. व्यवसायाने सनदी लेखापाल (CA) असलेल्या राघव चढ्ढा यांचा राजकारणातील प्रवास सर्वांनाच थक्क करणारा होता. राजकीय पटलावर आम आदमी पक्षाचा उदय आणि सोशल मीडियाचा जनमानसामधील वाढता प्रभाव हा एक समांतर प्रवास होता. परिणामी, सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या या पक्षातील नेत्यांना सोशल मीडियावरही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राघव यांचा साधेपणा आणि सर्वसामान्यांसारखे वागणे प्रस्थापित नेत्यांपेक्षा वेगळे ठरवत होते. तरुणाईला हा साधेपणा भवला आणि सोशल मीडियावर त्यांचा प्रचंड फॅन फॉलोअर वाढला.

Raghav Chadha News
Raghav Chadha |राघव चड्ढांना पक्षांतर नडलं! 'जेन झी'चा मोठा दणका; एका झटक्यात गमावले १० लाख फॉलोअर्स

अभिनेत्री परिणीती चोप्राशी असलेल्या मैत्रीमुळे चर्चेत

ब्लिंकिटवरून सामान मागवण्याचा त्यांचा व्हायरल व्हिडिओ असो किंवा दैनंदिन समस्यांवर चर्चा करणे असो, राघव चढ्ढा हे प्रस्थापित राजकारण्यांपेक्षा तरुणाईला नेहमीच आपल्या शेजारी राहणारा तरुण असेच वाटायचे. 'आप'मधील राजकीय प्रवासानंतर राघव यांच्या अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्याशी असलेल्या संबंधांमुळेही लोकांमध्ये त्यांच्याबद्दल आकर्षण निर्माण झाले होते. यातूनही त्यांची सोशल मीडियावरील क्रेझ वाढली.

Raghav Chadha News
Raghav Chadha: राघव चड्ढा AAP सोडून भाजपमध्ये का गेले? व्हिडिओ शेअर करत सांगितलं खरं कारण

परिणीती चोप्राशी लग्नानंतर नेमकं काय बदललं?

राघव यांचे लग्न अभिनेत्री परिणीती चोप्राशी झाले. यानंतर एक 'आप' नेता काही महिन्यांमध्येच सेलिब्रिटी नेता बनला. ज्या पिढीने त्यांना डोक्यावर घेतले होते, तीच पिढी आता त्यांच्यापासून पाठ फिरवताना दिसत आहे. याबाबत एका दूरचित्रवाणीशी बोलताना जेएनयू मधील राज्यशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक अजय गुडवर्ती सांगतात की, "राजकीय नेत्याची प्रतिमा ही अत्यंत नाजूक असते. युवा पिढीला नेहमीच तरुण खासदारांकडून सार्वजनिक नैतिकता आणि स्वच्छ राजकारणाची नवी संस्कृती आणली जाईल, अशी अपेक्षा असते. जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी लढणारा नेता अशी चढ्ढा यांनी स्वतःची प्रतिमा बनवली होती. परंतु अलीकडील घडलेल्या राजकीय घडामोडींनी त्यांच्या तरुण समर्थकांची निराशा केली आहे. 'झेन-जी' तरुण विश्वासघात किंवा स्वतःच्या फायद्यासाठी उचललेल्या राजकीय पावलांबाबत अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांना वाटले की एखादा नेता आदर्शवाद सोडून जुन्याच राजकारणाच्या वाटेने जात आहे, तर ते त्याला लगेच नाकारतात."

Raghav Chadha News
Raghav Chadha | "हा तर छोटासा ट्रेलर... पिक्चर अभी बाकी है"; राघव चढ्ढांचा नवीन व्हिडिओद्वारे 'आप'वर पलटवार

'अनफॉलो' करणे हाच आता विरोधाचा नवा मार्ग

डिजिटल जगात 'अनफॉलो' हा निषेधाचा नवा मार्ग आहे. रस्त्यावर उतरून गोंधळ न घालता किंवा वाद न घालता आपली असहमती नोंदवली जात आहे. सोशल मीडियावर लोकप्रियता अल्पावधीतच मिळते, मात्र ही लोकप्रियता टिकवून ठेवणे मोठे आव्हान असते. आता आपल्या साधेपणा आणि प्रामाणिक राजकारणी अशी प्रतिमा तयार करण्यात यशस्वी झालेले राघव यांनी घेतलेला राजकीय निर्णय तरुणाईला रुचला नसल्याचे सोशल मीडियावरील फॉलोअर्सची घटणारी संख्या दर्शवत आहे. परिणीती चोप्राबरोबर झालेल्या विवाहानंतर त्यांची झालेली सेलिब्रिटी राजकारणी इमेज आणि यानंतर आम आदमी पार्टीतून बाहेर पडत सत्ताधारी भाजपशी त्यांनी केलेली हातमिळवणी त्यांच्या सोशल मीडिया समर्थकांना रुचलेली नाही, हे स्पष्ट झाले आहे. आजची तरुणाई ही अधिक पारदर्शक राजकारणाला महत्त्व देत असल्याचे राघव चढ्ढा यांच्या घटलेल्या फॉलोअर्स संख्येने स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news