पुढारी ऑनलाईन डेस्क : जगदीप धनखड यांनी उपपराष्ट्रपतीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. या प्रकरणी विरोधी पक्ष सातत्याने केंद्र सरकारला सवाल करत होते. लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनीही एका कार्यक्रमात बोलताना केंद्र सरकारवर बोचरी टीकाही केली हाेती. आता धनखड यांच्या राजीनाम्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी प्रथमच भाष्य केले आहे.
जगदीप धनखड यांनी आपल्या राजीनाम्यात प्रकृतीच्या कारणांचा उल्लेख करत, ते तात्काळ प्रभावाने राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. वृत्तसंस्था 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शहा म्हणाला की, धनखड एका घटनात्मक पदावर होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात घटनेनुसार उत्कृष्ट काम केले. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या प्रकरणात कोणतेही अन्य कारण शोधण्याची गरज नाही. विनाकारण याला महत्त्व देणे चुकीचे आहे. विरोधी पक्षांनी कोणत्ाही गोष्टीचे अवडंबर माजवू नये. त्यांनी घटनेनुसार चांगले काम केले. त्यांच्याबद्दल विनाकारण बोलून काहीही फायदा होणार नाही.
धनखड यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्ष सातत्याने प्रश्न उपस्थित करत होते. एका कार्यक्रमात बोलताना लोकसभा विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी म्हणाले होते की, “जुने उपराष्ट्रपती कुठे गेले? ते का लपून बसले आहेत. त्यांच्या राजीनाम्यामागे एक मोठी कहाणी आहे. राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त राज्यसभा खासदार कपिल सिब्बल आणि शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनीही धनखड यांच्या राजीनाम्यावर सवाल उपस्थित केले होते.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. ते म्हणाले "सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना त्यांनी (सुदर्शन रेड्डी) 'सलवा जुडूम' रद्द केले होते. त्यांनी सलवा जुडूम रद्द केलं आणि आदिवासी लोकांच्या आत्मसंरक्षणाची प्रक्रियाच संपवून टाकली. याच कारणामुळे आज देशात नक्षलवाद दोन दशकांपेक्षा जास्त काळ चालला... डाव्या विचारसरणीकडे असलेला त्यांचा कल, हेच त्यांना उपराष्ट्रपतीपदासाठी निवडण्यामागे कारण असावं, असं मला वाटतं."
संविधानाच्या १३० व्या घटनादुरुस्तीला होणाऱ्या विरोधावरूनही अमित शहा यांनी विरोधकांना धारेवर धरले. या घटनादुरुस्तीमध्ये असा प्रस्ताव आहे की, जर कोणताही नेता गंभीर आरोपांखाली ३० दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिला, तर त्याचा राजीनामा आपोआप स्वीकारला जाईल आणि त्याला पद सोडावे लागेल. जेव्हा सीबीआयने माझ्यावर राजकीय हेतूने प्रेरित होऊन गुन्हा दाखल केला होता, तेव्हा मी राजीनामा दिला होता. त्यानंतर मला जामीन मिळाल्यानंतर मी सर्व अटी मान्य केल्या आणि पूर्णपणे निर्दोष मुक्तता झाल्यानंतरच मी कोणतेही पद स्वीकारले होते."
यावेळी अमित शाह यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आफताब आलम यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, "'आफताब आलम यांच्या कृपेमुळे' माझ्या जामिनावर दोन वर्षे सुनावणी चालली. भारताच्या इतिहासात कोणाच्याही जामीन अर्जावर दोन वर्षे सुनावणी चालली नाही. फक्त माझ्याच अर्जावर इतकी लांब सुनावणी चालली. गुजरातचे गृहमंत्री असताना अमित शाह यांच्यावर सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरण त्यांच्याच आदेशाने घडल्याचा आरोप होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन यूपीए सरकारने सीबीआयकडे सोपवला होता. शहा यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तीन आठवड्यांनंतर त्यांना उच्च न्यायालयातून जामीन मिळाला, पण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यावर त्यावर स्थगिती आली. त्या खंडपीठाचे नेतृत्व आफताब आलम करत होते.