

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून ते कुठे गायब आहेत? त्यांच्या आरोग्याबद्दल आणि सुरक्षेबाबत चिंता वाटत आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संदर्भात विधान करावे, असे आवाहन राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी शनिवारी केले. राजीनामा दिल्यापासून जगदीप धनखड सार्वजनिकरित्या कार्यक्रमात किंवा इतरत्र दिसले नाहीत, असे सिब्बल म्हणाले.
पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल म्हणाले की, "लापता लेडीज" चित्रपटाबद्दल ऐकले होते पण कधीही "लापता उपराष्ट्रपतीं" बद्दल ऐकले नाही. उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर, आम्हाला त्यांच्या ठावठिकाण्याबद्दल काहीही माहिती नाही. सिब्बल यांनी दावा केला की, धनखड त्यांच्या अधिकृत निवासस्थानी नाहीत.
२२ जुलै रोजी, जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला. आज ९ ऑगस्ट आहे आणि त्या दिवसापासून, ते कुठे आहेत हे आम्हाला माहित नाही, असे ते म्हणाले. मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या खाजगी सचिवांनी फोन उचलला आणि सांगितले की ते विश्रांती करत आहेत, असे सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
इतर काही राजकीय नेते देखील त्यांच्याशी संपर्क साधू शकले नाहीत. मग, ते कुठेतरी उपचार घेत आहेत का? त्यांच्या कुटुंबातील लोकांनीही काहीही सांगितले नाही, काय समस्या आहे?, असे ते म्हणाले.